20200330_122617
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३
– आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई/ प्रतिनिधी :
राज्यात आज कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २ कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला, तो मधुमेही होता. राज्यातील कोरोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.
————————-
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील :-

मुंबई ८५, पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ३७, सांगली २५, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३, नागपूर १४, यवतमाळ ४, अहमदनगर ५, सातारा २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १, इतर राज्य- गुजरात १, एकूण २०३ राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४२१० जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १७ हजार १५१  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत ३५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ८, यवतमाळ-३, अहमदनगर- १, नागपूर- १, औरंगाबाद- १ या रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply