IMG-20200914-WA0005
कर्जत ताज्या नेरळ पनवेल माथेरान सामाजिक

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका

पनवेल/ प्रतिनिधी :
पेब किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार 13 सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले. ओमकार शिरीष शेट्टी (24, मुंबई), जयेश संजय मेहता (वय 23, मुंबई) पुनीत रामदास बेहलानी (23, मुंबई) अशी तिघांची नावे आहेत.
पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, रायगड येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक पनवेलमध्ये ट्रेकिंगसाठी येत असतात. कर्नाळा किल्ला, माची, प्रबळ, पेबगड अशा ठिकाणी ट्रेकिंगची निवड पर्यटकांकडून केली जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पर्यटकांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे तसेच काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्याने पर्यटकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. परिणामी पर्यटक चुकीचा रस्ता निवडतात आणि पोलिसांना चकवा देऊन ट्रेकिंगसाठी निघून जातात. अशाच प्रकारे 13 सप्टेंबर रोजी मालाड, मुंबई येथील ओमकार शिरीष शेट्टी, जयेश संजय मेहता, पुनीत रामदास बेहलानी हे तिघेजण पेबगडला ट्रेकिंगसाठी निघाले.
पनवेल तालुक्यातील धोदानी – मालडुंगे येथून येथे त्यांनी आपली कार पार्क केली आणि ते पायी चालत ट्रेकिंगसाठी निघाले. पेबगडच्या दिशेने जात असताना ते रस्ता भरकटले. जंगलामध्ये त्यांना कोणताही खाली उतरण्याचा रस्ता दिसून येत नसल्याने त्यांची धमछाक झाली. जंगलात त्यांना खाली येण्याचा आणि पुढे जाण्याचा रस्ता सापडलाच नाही. यावेळी त्यांनी नेरे येथील रुपेश पाटील यांना फोन केला व ते रस्ता चुकले असल्याचे त्यांनी त्याला सांगितले.
यावेळी हे तिघेही रस्ता चुकल्याने पाय घसरून पडले होते व त्यांना थोड्याफार जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पाटील यांनी याची माहिती तालुका पोलिसांना दिली. यावेळी चुकलेल्या त्या तीन तरुणांनी पाण्याचा धबधब्याजवळ उभे असल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी त्याठिकाणी पोलीस पाठवले. मात्र त्या ठिकाणांची माहिती नसल्याने पोलिसांनी संतोष उघडे या आदिवासी मुलाला सोबत घेतले व सायंकाळी चार ते साडेचार दरम्यान पोलीस पेब किल्ल्यावर जाण्यासाठी निघाले. यावेळी ते ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणचे लोकेशन समजत नसल्याने तिघांना शोधणे मुश्कील झाले होते. मोबाईल फोनवरून संपर्क साधून अखेर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी या तिघांनाही सुखरूपपणे खाली आणले व त्या तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर त्यांना मालाड येथे जाण्यास परवानगी देण्यात आली.

Leave a Reply