IMG-20190815-WA0030
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड

स्वातंत्र्य प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत मी रणांगणात- विवेक पंडित

  • श्रमजीवीच्या जनसागराने गणेशपुरी दुमदुमली
  • स्वातंत्र्याचे मूल्य काय आहे याची समाजाला  शिकवण देणाऱ्या अनोख्या स्वातंत्रोत्सवाची साडेतीन दशके
  • संघटन शक्तीचा जगाला आदर्श देणाऱ्या श्रमजीवीचा सार्थ अभिमान- पत्रकार शरद पाटील

भिवंडी/ प्रमोद पवार :
भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र नेहमीप्रमाणे साजरा होत असतो, शासकीय राजकीय कार्यक्रम होत असतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे एक अनोखा स्वातंत्र्योत्सव पार पडला, ज्यांना स्वातंत्र्यानंतर इथल्या व्यवस्थेने केवळ वेदना, भूक, बेरोजगारी आणि दारिद्र्यच दिले अशा कष्टकरी बांधवांचा हा अनोखा उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वज्रेश्वरी ते गणेशपुरी अशी भव्य मिरवणूक यावेळीही काढण्यात आली. स्वातंत्र्याचे काय मूल्य आहे हे दाखविणारे हे अदिवासी कष्टकरी गेली साडेतीन दशके हा कार्यक्रम अखंडपणे साजरा करत आहेत. आपल्या एकतेची, संघटित शक्तीची ऊर्जा घेऊन इथून दरवर्षी सभासद परत जात असतात असे बोलले जाते.
या अभिनव झेंडावंदनाला एक संघर्षमय इतिहास आहे. 1983 -84 पासून जातीयवादी सावकारी मानसिकतेचा प्रस्थापितांचा विरोध डावलून संघटनेचे संस्थापक विवेक आणि विद्युलता पंडित यांनी झेंडावंदन कार्यक्रम सुरू केला होता. वसईतील देपिवली गावात ही सुरुवात झाली. तेव्हा पासून हा कार्यक्रम गेली 36 वर्षे अविरत सूरु आहे. आज झालेल्या उत्सवात या पालघर,ठाणे ,रायगड आणि नाशिक जिल्हयातील सुमारे 15 हजार सभासद सहभागी झाले होते, गेली 36 वर्षे अखंडपणे चढत्या आलेखाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव गणेशपूरी येथे होत असतो, 10 वर्षाचे बालकार्यकर्ते पासून तर 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच यात सहभागी होता. एवढ्या मोठ्या संख्येने घाम गाळणाऱ्या आदिवासींचा एकत्र येऊन होत असलेला हा झेंडावंदन भारतातील एकमेव रेकॉर्डब्रेक कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला प्रचंड महत्व आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 35 वर्ष उलटलेली तेव्हाही येथील आदिवासी बांधव वेठबिगारीत, पारतंत्र्यात होता, तेव्हा स्वातंत्र्य हा शब्दही ज्याने ऐकलं नाही, राष्ट्रध्वज पहिला नाही अशा भारतीयांना घेऊन आम्ही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, स्वातंत्र्याची किंमत आम्ही स्वातंत्र्य भारतात मोजली आहे, म्हणून स्वतंत्र किती मौल्यवान आहे हे माझ्यासह माझ्या संघटनेच्या प्रत्येक बांधवाला माहिती आहे असे प्रतिपादन यावेळी श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी केले. तसेच संघटना ही कोणत्याही जाती धर्माच्या बंधनात नसून ज्याच्यावर अन्याय होईल अशा प्रत्येकासाठी संघटना असल्याचे पंडित यांनी आडोरेखीत केले. मी सरकार सोबत असो नसो, कोणत्याही शासकीय पदावर असो नसो मी आधी संघटनेचा आहे, जेव्हा जेव्हा अदिवासी गरीब कष्टकऱ्यांवर अन्याय होईल अशी भूमिका सरकार घेईल तेव्हा सगळ्यात आधी आवाज हा विवेक पंडित उठवतो आणि यापुढेही उठवेल असे त्यांनी ठाम पणे सांगत भारतीय वन अधिनियम सुधारणा विधेयक 2019 च्या अन्यायकारक मसुद्याला केलेल्या विरोधाचे उदाहरण देत स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी असलेल्या ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांनी आपल्या मनोगताने सर्वाना मंत्रमुग्ध केले, ज्या संघटनेच्या विरोधात मी टोकाचे लिखाण केले आज त्याच संघटनेचा मला अभिमान वाटतो आणि मी ते जाहीरपणे मान्य करतो असे त्यांनी सांगितले. संघटना पाटील समाजाच्या विरोधात असल्याचे चित्र उभे करणाऱ्यांमध्ये एके काळी सहभागी आसलेल्या या पाटलाच्या पोराला आज संघटनेने हा अविश्वसनीय सन्मान देऊन मला कायमचा संघटनेचा बनवून टाकला असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. संघटना ही प्रत्येक जाती धर्मातील दुर्बल बांधवांच्या हक्काचे घर आहे हे सांगत त्यांनी अनेक उदाहरण देत त्यांनी विवेक पंडित यांच्या कार्याचा गौरव केला.
श्रमजीवी संघटना गेली 35 वर्षे आदिवासी कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. या स्वातंत्र्य उत्सवाला एक क्रांतिकारी इतिहास आहे. संघटनेने जेव्हा काम सुरू केले तेव्हा स्वातंत्र्याला 35 वर्ष लोटलेले, मात्र स्वतंत्र भारतात देखील सावकारी गुलामगिरीच्या पाशात अडकलेल्या आदिवासींना स्वतंत्र शब्दाचा अर्थ सोडा साधा हा शब्दही त्यांच्या कानी कधी पडला नसल्याचे विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांच्या लक्षात आले. त्यानंतर जेव्हा त्यांनी या वंचितांना घेऊन झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर तो त्या काळच्या प्रस्थापित पुढारी आणि मालकधार्जिण्या सरकारने हा झेंडावंदन गुन्हा ठरवत पंडित दाम्पत्यासह तेरा कार्यकर्त्याना तुरुंगवास भोगावा लागला होता, स्वातंत्र्य भारतात देखील ह्या कार्यकर्त्यांनी कडवी झुंझ देत आपला स्वतंत्र्याचा  हक्क बजावला. त्यानंतर हा स्वातंत्र्य उत्सव अविरतपणे सूरू आहे. तो आज सलग साडेतीन दशके सातत्याने सुरू आहे हे विशेष.
या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला, यावेळी श्रमजीवी संघटनेच्या आणि विधायक संसद च्या संस्थापिका विद्युलता पंडित, संस्थापक तथा  राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील ,ज्येष्ठ पत्रकार एस.रामकृष्ण श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर,उपकार्याध्यक्ष स्नेहा दुबे-पंडित,उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, मुंबई जिल्हाध्यक्षा नलिनी बुजड, रायगड जिल्हाध्यक्ष अशोक पवार, भगवान मधे, नाशिक जिल्हासरचिटणीस रामराव लोंढे, यांच्यासह सर्व राज्य, जिल्हा, तालुका, झोन आणि गावकमेटी पदाधिकारी या सोहळ्याला सहभागी झाले होते.

Leave a Reply