IMG-20211202-WA0064
उरण कर्जत ठाणे ताज्या नागपूर महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना

प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू…

अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना

प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ भारतीय रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य अभिजित पां. पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
पनवेल येथून हार्बर मार्गाने मुबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणारी पहिली हार्बर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर पनवेलसह नवी मुंबईच्या विकासाला गती मिळाली. कालांतराने येथील लोकवस्ती वाढली आणि प्रवाशी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रवाशांना अनेक अडचणी येवू लागल्या आणि याची दखल पनवेल प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांनी घेवून पाठपुरावा करून ही रेल्वे सेवा अंधेरी पर्यंत जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत आणली. मात्र सदर रेल्वेसेवा बोरिवली जंक्शन पर्यंत पोहचविण्यासाठी धडपडणाऱ्या प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना काही अंशी यश मिळालेच. बुधवार (दि. ०१ डिसें.) रोजी पनवेल स्थानकातून अंधेरी येथे जाणारी रेल्वे गोरेगांवपर्यंत जाण्यासाठी सज्ज झाली. यावेळी भारतीय रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पां. पाटील, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, श्रीकांत बापट, राष्ट्रवादीचे नेते सुदाम पाटील, पनवेल रेल्वे प्रबंधक श्री.मीना आदींनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना डॉ. भक्तिकुमार दवे यांनी सांगितले की, आम्ही गेले कित्येक वर्षे प्रवाशांच्या सेवेत काम करीत आहोत. अनेक प्रवाशी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे मांडतात आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहतो. आज सुरू झालेली गोरेगाव ही रेल्वेसेवा प्रशंसनीय तर आहेच मात्र आमची मागणी खऱ्या अर्थाने तेव्हाच पूर्ण होवू शकेल ज्यावेळी ही रेल्वेसेवा पनवेल ते बोरिवली पर्यंत प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. आम्ही प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी जे प्रयत्न निष्ठेने केले आहेत त्यात आम्हाला यश हे मिळेलच, यात शंका नाही.
यावेळी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पां. पाटील यांना रेल्वेच्या समस्यांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी मी या समितीवरील पदाचा पदभार स्वीकारला त्याच दिवसापासून नागरिकांना रेल्वे प्रशासनाबाबत कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यातून कोणता मार्ग काढावा यासाठी काम करीत आलो आहे. पनवेल रेल्वे स्थानकाचा विचार करता त्यावेळी येथील शौचालयाची झालेली दुरावस्था, मोडकळीस आलेली बसण्यासाठीची आसने, पिण्याच्या पाण्याची होत असलेली गैरसोय याबाबत प्राथमिक स्वरूपात प्रयत्न केले आणि त्याला रेल्वे प्रशासनाने दिलेल्या उत्तम साथीमुळे आज प्रवाशीवर्गाला समाधान लाभत आहे. आपण एक पदाधिकारी जरी असलो तरी प्रवाशी आणि प्रशासन यांच्यामधील एक दुवा आहोत, आपल्याला जितके चांगले काम करता येईल तितके चांगले काम करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करीत राहणार.

Leave a Reply