IMG-20220217-WA0000
अलिबाग कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र सामाजिक

कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !

कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !

 ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद
 ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं

पनवेल/ प्रतिनिधी :
कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, ठेविदार भरकटलो होतो. कुणी मदत करेल या अपेक्षेने चातकासारखी वाट पाहत होतो. पण कुणाकडून काहीच मदत होण्याची सुतराम शक्यता नव्हती. फक्त आणि फक्त घाणेरडे राजकारण सुरू होते. अशा परिस्थितीत अगदी मृत्यूच डोळ्यासमोर दिसत असताना एक अवलिया समोर आला कांतीलाल कडू नावाचा आणि त्यांनी अस्मानी संकटातून तारून आम्हाला जगण्याची नवी उमेद दिली, अशा भावना व्यक्त करत ठेविदारांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
बुडित कर्नाळा बँकेच्या पहिल्या दोनशे ठेविदारांना आजपासून विम्याचे पैसे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकार्‍यांनी गेल्या दिड वर्षात दिलेल्या धाडसी लढ्यामुळे विम्याचे 374 कोटी रूपये आले आहेत. त्याच्या वाटपाचा शुभारंभ बँकेतून होत असल्याचा मुहूर्त साधत आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेविदारांसोबत कडू यांनी ‘जल्लोष आनंदाचा, जल्लोष सत्याचा’ साजरा केला. कामाचा दिवस असतानाही हजारो ठेविदारांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून जल्लोषाला चार चॉंद लावले.
कोळीवाडा येथील सरस्वती ब्रॉस बॅण्डच्या तालावर ठेविदारांनी वय विसरून ताल धरला. त्यांचे हे नृत्य डोळ्यात साठवण्यासाठी नभी सूर्य नारायण शितलतेने त्यांच्यावर बरसत होते. कांतीलाल कडू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत खांद्यावर घेवून नृत्य केले. महिलांनी तर धमाल गर्दी केली होती. आजच्या जल्लोष उत्सवाने ठेविदारांचे तेज वाढले आहे. ठेविदारांच्या आनंदाने शिवाजी महाराज चौकाला आलेली रौनक डोळे दिपवणारी होती.
 डॉ. चंद्रकात गायकवाड, रत्ना बडगुजर, प्रतिमा (शैला) मुरबाडकर, टी. नम्रता, अशोक मुणोथ, मनोहर उरणकर, रमेश महाले, जयश्री गोखले आदींनी काळजातून मनोगत व्यक्त केले. सर्वांनी लढ्यातील सत्य मांडताना कांतीलाल कडू आणि संघर्ष समितीच्या अलौकिक कार्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. कांतीलाल कडू यांच्यामुळेच ठेविदारांचा आजपासून सुखाचे दिवस बघायला मिळतील. हे श्रेय कडू आणि त्यांच्या संघर्ष योद्धा सहकार्‍यांचे असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply