IMG-20191107-WA0033
कोकण ठाणे महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

…आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली! आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव.

आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली

  • आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव

जव्हार/प्रतिनिधी :
शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते, या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते, यात आतापर्यंत ठाणे पालघर मध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली (रागी) या भरड धान्याचा समावेश रेशनिंग मध्ये करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेली. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली. आता पारित झालेल्या भरडाई मार्गदर्शक शासन निर्णयात नागली हमी भावात खरेदी करण्याचा आदेश दिल्याने या भागातील विशेषतः जव्हार, मोखाडा तसेच नाशिक मधील आदिवासी भागातील शेतकरी पिकवत असलेल्या नागलीला हमी भाव मिळणार असून स्थानिक पदार्थ रेशनवर मिळणार आहे.
शेतकऱ्याला हमी भाव मिळावा आणि येथील आदिवासी बांधव जे भरड धान्य आपल्या नियमित भोजनात घेतो तेच रेशनवर द्यावे अशी मागणी होती. रेशनवर मिळणाऱ्या गहू बाबत आदिवासी बांधव जास्त इच्छुक नसायचा, यामुळे रेशनवर विक्री न झालेल्या धान्याच्या काळाबाजाराला वाव मिळायचा. आता रागी म्हणजेच नाचणी किंवा नागली या स्थानिक नावाने प्रचलित असलेला भरडधान्य आता हमी भावात म्हणजे तब्बल 3150 रुपये प्रति क्विंटल या भावात खरेदी केला जाणार आहे. याची पूर्ण जबाबदारी आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळ तर बिगर आदिवासी भागात मार्केटिंग फेडरेशन ची असेल, हे धान्य खरेदी करून त्याची स्थानिक मिलर्स कडून भरडाई करून घेऊन ते धान्य रेशनवर दिले जाईल असे शासन निर्णयात नमूद आहे.
या निर्णयामुळे याभागात आदिवासी शेतकरी पिकवत असलेल्या नागली ला आता हमी भाव मिळणार असून शेतकऱ्यांना नगदी पिकाच्या स्वरूपात नागलीचा लाभ होणार आहे, तसेच नागलीचा पौष्टीकता लक्षात घेता आदिवासींच्या आहारातही सकस धान्य रेशनवरून मिळेल असा दुहेरी लाभ याभागातील आदिवासींना मिळणार आहे.
यापूर्वी श्रमजीवी संघटनेने केलेल्या खाद्यतेल आणि तूरडाळ रेशनवर देण्याच्या मागणीचा शुभारंभ मागील महिन्यात जव्हार मोखाड्यात झाला आता नागलीही रेशनवर येणार असल्याने आदिवासींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply