ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेलमधील दुंदरे गावातील महिलेची हत्या की आत्महत्या? मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क

पनवेलमधील दुंदरे गावातील महिलेची हत्या की आत्महत्या? मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क

पनवेल/ प्रतिनिधी :
नवीन सोन्याची गंठण चोरीला गेल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणातून पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात राहणाऱ्या शारदाबाई गोविंद माळी या वृद्ध महिलेने रहात्या घरात गळफास घेऊन आमत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र शारदाबाईंच्या गळ्यावर जळाल्याच्या जखमा व त्यांचे केस जळाल्याचे आढळून आल्याने शारदाबाई माळी यांना जाळण्याचा प्रयत्न करुन त्यांना गळफास देण्यात आल्याचा आरोप शारदाबाई यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे शारदा माळी यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.
या घटनेतील मृत शारदा माळी या पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात पती दोन मुले व सुन यांच्यासह रहाण्यास असून गेल्या ३ फेब्रुवारी त्यांनी २९ हजार रुपये किंमतीची सोन्याची गंठण बनवून घेतली. त्यानंतर सदरचे गंठण ते दाखवित असताना, रात्रीच्या सुमारास शेजारी रहाणारया अल्पवयीन मुलीने त्यांचे गंठण उचलून नेले. त्यामुळे शारदा माळी यांनी शेजारी राहणाऱ्या मुलगीची आई अलका पाटीलकडे गंठण बाबत विचारणा केल्याने त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. या भांडणात अलका पाटील हिने आपल्या मुलीचे नाव का घेता असे बोलून शारदाबाई माळी आणि तीचे पती गोविंद माळी यांच्याशी वाद घालून भांडण काढले. तसेच त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अलकाचा पती गोपाळ पाटील व हनुमान पाटील या दोघांनी देखील शारदा माळी यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करुन त्यांना बघुन घेण्याची धमकी दिली. गोपाळ पाटील याने गावदेवीच्या मंदिरात जाऊन शपथ घेण्याची सुचना केल्यानंतर रात्री सर्वजण गावदेवीच्या मंदिरात गेले. यावेळी ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल, अशी शपथ घेतली. त्यानंतर सर्वजण घरी परतले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शेजारी राहणाऱ्या अलका पाटील आणि वनाबाई दवणे या दोघींनी शारदा माळी यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करुन शारदाबाई यांना विवस्त्र करुन मारण्याची धमकी दिली. तसेच ‘देव तुला आज ठेवणार नाही,आजच्या आज घेऊन जाईल’ असे बोलून आरडाओरड केली. या घटनेनंतर शारदा माळी यांच्या घरातील सर्व जण आपापल्या कामावर निघून गेले. त्यानंतर दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शारदाबाई या आपल्या घरातील पहिल्या मजल्यावर संशयास्पदरित्या गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आल्या. शारदाबाई यांच्या अंगावर साडी नसल्याचे, तसेच त्यांच्या गळ्यावर भाजल्याचे व त्यांचे केस जळाल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आल्याचे आढळून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अलका पाटील, वनाबाई दवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील आणि दागिने चोरल्याचा आरोप असलेली अल्पवयीन मुलगी या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र शारदाबाई पाटील या ज्या ठिकाणी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या, त्याठिकाणी त्यांच्या अंगावर साडी नसल्याचे तसेच त्यांचे केस, व गळ्यावर भाजल्याच्या जखमा आढळुन आल्या आहेत. त्यामुळे शारदाबाई यांना प्रथम जाळण्याचा प्रयत्न करुन नंतर त्यांना गळफास देऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत शारदाबाई यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply