IMG-20220623-WA0000
उरण कर्जत कल्याण कोकण खारघर ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल पालघर पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन 

पनवेल/ प्रतिनिधी :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने देण्यात आली. 
शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सहचिटणीस संतोष केणे, खजिनदार जे. डी. तांडेल यांनी पत्रकारांना आंदोलनासंदर्भात माहिती दिली. यावेळी विजय गायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मागील आंदोलनाची पार्श्वभूमी सांगतानाच दिबांचेच नाव विमानतळाला लागेपर्यंत व भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यँत हा लढा कायम राहणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी १० जूनला भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च भुमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारीचे विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. पण सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आली आहे. त्यामुळे येथील भूमिपूत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील २४ जुनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सुदैवाने भूमिपुत्रांच्या एकीमुळे बाळासाहेबांच्या नावाचा ठराव अद्याप मंत्री मंडळाच्या बैठकीत अथवा विधानसभेत आणला गेला नाही.  सिडको आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने नवी मुंबई वसवताना सरकारने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टीतील ९५ गावातील ६५ हजार शेतकर्यांच्या कुटुंबाच्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने संपादीत केल्या आणि आज त्यावर सिडकोने हजारो कोटी कमवले आहेत. पण १०० टक्के भूमिहीन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचे झाले की, सिडको उदासिन दिसते. म्हणूनच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित असल्याचे दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधीत २७ गावाच्या समस्या, नैना प्रकल्पाच्या समस्या असे अनेक प्रश्न सिडकोच्या उदासिन वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकताच केलेल्या शासन निर्णयात २५० मीटरचे निकष, भाडेपट्टा अश्या अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९ व्या स्मृतिदिनी म्हणजे २४ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता सिडको घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्यावतीने सांगतानाच या आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ~~~~~~~~~~~~~~~~~~

● या आहेत मागण्या…

 २८ एप्रिल २०२१ रोजी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत सिडकोने केलेला ठराव विखंडीत करून प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या भावना लक्षात घेऊन लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा नवीन ठराव सिडकोने करावा.,  जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनाविलंब साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करावे. दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सरकारने काढलेला, नवी मुंबईतील, गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांबाबतच्या शासन निर्णयामध्ये प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन बदल करण्यात यावेत., विमानतळबाधीत २७ गावांच्या समस्या त्वरेने सोडवाव्यात. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न बैठका घेऊन तातडीने सोडवले जावेत. 
————————-

२४ जूनचा लढा हा ऐतिहासिक दिन म्हणून ओळखला जात आहे. निस्वार्थी व आदर्श जीवन असलेले दिबासाहेब हे सर्व समाजाचे आदर्श. विमानतळाला त्यांचे नाव द्यावे यासाठी सन २००८ पासून मागणी होत आहे. हे आंदोलन राजकारण विरहित आणि भूमिपुत्रांचे आहे. हा लढा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. येत्या ऑक्टोबर महिन्यात दिल्ली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला २ लाख लवणकार उपस्थित राहणार असून त्यावेळीही दिबासाहेंबाच्या नावाचा गजर होणार आहे.
– दशरथ पाटील, अध्यक्ष-कृती समिती 
————————-

○ शासन हि एक अंमलबजावणी करणारी संस्था असते, त्यामुळे भूमिपुत्रांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी हा लढा आहे. आम्ही कुणाच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवावेत या साठी त्या-त्या संस्थांकडे मागणी करतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला खूप मोठे प्रकल्प आहेत, मात्र या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे दैवत दि. बा. पाटील साहेबांचेच नाव हवे. आणि त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. मागील वर्षी २४ जूनला लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र सामील झाले होते, ते आंदोलन शिस्तीने झाले होते आणि संपूर्ण देशाला भूमिपुत्रांची ताकद दाखवून दिली होती. आताच्या आंदोलनात २० ते २५ हजार भूमिपुत्र सहभागी होतील आणि आमचा लढा हा विजयी होईपर्यंत सुरुच राहील.
– लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 1 =