20200329_225350
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

वाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.

वाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.

 

मुंबई/ प्रतिनिधी :
बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना  वॉर्डनिहाय या समित्यांची नोंदणी  करण्याची सूचनाही दिली.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत  परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दत्तक वस्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याची तसेच योजनेची पुर्नरचना करण्याची मागणी  केली. यामुळे अधिक सहजपणे लोकांच्या घरापर्यंत पोहोचता येईल असे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी  मुंबईत २००१ ते २०१३ या काळात दत्तक वस्ती योजना तर २०१३ पासून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान मुंबईत राबविले जात असल्याचे सांगितले. धारवीच्या कोरोना यशात सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा एक भाग अतिशय महत्वाचा ठरला असल्याचे सांगतांना त्यांनी मुंबईत स्वंयसेवी संस्थांचे ८३८ गट आणि त्याद्वारे ११ हजार लोक काम करत असल्याची माहिती दिली.

>> कायमस्वरूपी यंत्रणा हवी –
नागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वंयसेवी संस्थांची ही यंत्रणा कायमस्वरूपी मुंबईत कार्यरत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिक, स्वंयसेवी संस्था आणि प्रशासनात एकजुट असेल तर आपण कोरानाचे संकट नक्कीच परतवून लावू. चेस द व्हायरस चे काम महापालिका करत आहेच ते ज्या ठिकाणी काम करत आहेत ती ठिकाणी सोडून इतर ठिकाणी चेस द व्हायरस ही संकल्पना स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवावी व प्रत्येक वस्तीमधील नागरिकांची तपासणी केली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरवण्यात यावे.

>> समित्यांनी जनजागृती करावी –
एखाद्या गोष्टीवर जेंव्हा जनभावना एकवटते तेंव्हा निर्विवाद यश मिळतेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गावपातळीवर कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सुचना मी दिल्या आहेत. जग, राज्य, जिल्ह्याची चिंता करण्याआधी प्रत्येक गावाने आपले गाव, घर अंगण स्वच्छ ठेवण्याचे ठरवले तरी आपण कोरोनाला आणि पावसाळ्यातील आजारांना हरवू शकू. कोरोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सुचनांचे पालन स्वंयसेवी संस्थांनी  मुंबईतील वस्त्यांमधील लोकांकडून करून घेतले तरी आपण मुंबईला सुरक्षित ठेऊ शकू. त्यादृष्टीने या संस्थांनी जनजागृती करावी असेही ते म्हणाले.

>> फवारणीच्या कामात मदत घ्यावी –
पावसाळ्यातील साथीचे आजार दूर ठेवण्यासाठी स्वंयसेवी संस्थांच्या  टीमच्या  सहकार्याने रस्ते, बांधकामाधीन इमारती, पूल बांधकामे याठिकाणी निर्जुतुकीकरणाचे, धुर फवारणीचे काम केले जावे अशी सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीच्या केंद्रीय पथकाने मुंबईतील झोपडपट्टीची पाहणी केल्यानंतर तेथील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा विषयक प्रामुख्याने मांडला होता. आपण दिवसातून सहा वेळा सार्वजनिक शौचालयांचे निर्जुंतूकीकरण केल्याने धारावीसारख्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात आणता आला. अशाचपद्धतीने डासांचे निर्मुलन करण्याकरिता आवश्यक असलेली धूर फवारणी करणे गरजेचे आहे. परराज्यातील कामगार यावेळी निघून गेल्याने विकासकांवर ही जबाबदारी पूर्णत: सोपवता येणार नाही आणि एकट्या महापालिकेलाही हे काम करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत एनजीओचे सहकार्य घेऊन फवारणीचे काम करण्यात यावे त्यासाठी महापालिकेने आवश्यक असलेली फवारणी यंत्रे स्वंयसेवी संस्थांना द्यावीत ही सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

>> सुरक्षा साधने पुरवावीत –
मृत्यूदर कमी करण्याचे महत्वाचे काम आपल्याला करायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या विभागात खाजगी डॉक्टर, दवाखाने असतील तर त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, त्यांना सुरक्षासाधने पुरवण्यात यावीत.  कोराना प्रतिबंधक काम करताना स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी वाड्या वस्त्यात फिरत आहेत. झोपडपट्टयांमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. महापालिकेने त्यांनाही सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून द्यावीत.

>> वेळेत उपचार केंद्रात पाठवा –
स्वंयसेवी संस्थांच्या टीमने घरोघरी जाऊन तपासणी करतांना लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अधिकृत कोविड उपचार केंद्राकडे पाठवावे. गोल्डन अवरमध्ये पेशंट रुग्णालयात आल्यास आपण त्याला वाचवू शकतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकांच्या मनात विलगीकरणाबाबत असलेली भीती काढून टाकण्यासाठीचे मार्गदर्शन, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि कॉरंटाईनच्या कामातही कदत करण्याची भूमिका ही एनजीओ नी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

One thought on “वाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 59 = 62