IMG-20210614-WA0055
उरण ताज्या रायगड सामाजिक

रानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता

रानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता

रायगड भूषण राजू मुंबईकर यांचा रस्त्यासाठी पुढाकार

 

उरण/ विठ्ठल ममताबादे :
दूर- दुर्गम डोंगर दऱ्यात राहणारा माझा आदिवासी बांधव हा नेहमीच समाजापासून वंचित आणि उपेक्षितच राहिला आहे. त्यांना त्यांच्या सोयीसुविधांचा वाणवा हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवतो.आज सुद्धा ते आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत प्रामुख्यानं शिक्षण,आरोग्य व्यवस्थेपासून ते दळण- वळणाच्या सोयी सुविधा आणि रोजच्या प्रवासाकरीता योग्य रस्ते ह्या मूलभूत गोष्टींचा वाणवा असलेल्या ह्या समाजाला आज समाजाच्या मुख्यप्रवाहात  आणण्याकरीता बरीच मंडळी  आपलं सामाजिक उत्तरदायित्व  जपत मोठ्या मनानं ह्या बांधवांकरीता  समाजकार्य करतं  आपलं योगदान देत आहेत त्यातलंच एक नावं म्हणजे केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर. असं म्हणतात कि ” स्वहिताला परहिताची जोड “आपण जे मिळवतो,कमावतो त्यातील थोड्या प्रमाणात आपण इतरांना देऊ शकलो तर ते कार्य एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देते आणि तेच कार्य आज  राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून साकार झाला.  उरण रानसई येथील आदिवासी वाडीवरील मार्गाची वाडी ते  ट्रान्सफार्मर पर्यंतचा तब्बल 150 ( दीडशे )  मीटरचा संपूर्ण रस्ता  स्वतःच्या खिशाला कात्री लावून स्वतः स्वखर्चातून  सिमेंट काँक्रीटनं अगदी भक्कम पद्धतीने  नवीन रस्ता राजू मुंबईकर यांच्याकडून बांधण्यात आला.  या आधी ह्या रस्त्याची दूरावस्था येवढी भयानक होती कि अक्षरशः एक एक फुटाचे खड्डे   पडलेल्या त्या रस्त्यात अनेक दुचाकीस्वार खाली पडून जखमी जखमी झालेत. तर ह्या कोरोनाच्या काळात वाडीवरून कामानिमित्त मजुरीसाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्यां टेम्पोचा अपघात होऊन अक्षरशः टेम्पो वीस ते तीस फूट रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात जाऊन आदळला.आणि त्यातील सात आठ आदिवासी बांधव गंभीररीत्या जखमी झाले.आणि  ह्या खराब रस्त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणारा आदिवासी बांधव, महिला वर्ग आणि शाळा कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी तरुण तरुणी यांची होणारी गैरसोय आणि त्यांना सहन करावा लागणारा त्रास हा राजू मुंबईकर यांना पाहावलां नाही  खरं म्हणजे त्यांना ह्या विचारांनी स्वस्थ झोपुच दिलं नाही, असं म्हणालं तर वावगं ठरणारं नाही आणि त्यांनी त्या आदिवासी बांधवांना मागच्या वर्षी आदिवासी मेळाव्यात  दिलेला शब्द पूर्ण केलाच हा  दीडशे मीटरचा रस्ता बनवत असताना त्याला लागणारं सामान म्हणजे सिमेंट, खडी ,ग्रीट्स, दगड, चिपळी पाण्याचा टँकर, सिमेंट मिक्सर , जेसीबी यांचं पूर्ण नियोजन करून ह्या आदिवासी बांधवांचा जीवनप्रवास सुखकर केला.
रस्त्याच्या बांधकामा करीता रानसई येथील चार आदिवासी वाड्यातील सर्व आदिवासी बांधवांना राजू मुंबईकर यांनी एक आवाहन केलं होतं कि आपणांस असेल वेळ थोडा ! तर श्रमदाना करीता जोडा !! आणि या आवाहनाला अगदी उदंड प्रतिसाद देत किमान अडीचशे ते तीनशे आदिवासी बांधव आपली औजारे, कुदळ, फावडे, घमेलं, थापी, लाकडी रंधा घेऊन  सकाळी ठीक आठ वाजता कामाच्या ठिकाणी प्रामाणिक पणे हजर झाले आणि खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांच्या श्रमदानातुन आणि राजू मुंबईकरांच्या सहकार्यातून  सुरू झालेलं हे पवित्र कार्य संध्याकाळी सात वाजेपर्यंत न थांबता,न थकता अखंडित पणे सुरु ठेऊन पूर्णत्वास नेले.
ह्या आदिवासी बांधवांच्यां सुखाचा प्रवासाकरीता बांधण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी  जे.एम.म्हात्रे ट्रस्ट पनवेल आणि पी पी .खारपाटील ट्रस्ट चिरनेर यांनी विशेष सहकार्य केले. ह्या  कामाच्या ठिकाणी म्हणजेच रानसई मार्गाची वाडी येथे राजू मुंबईकरांच्या प्रेमापोटी आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूल मधून खास वेळ काढून आवर्जून हजर राहिले ते सामाजिक कार्यकर्ते संतोष  पवार, अनुज पाटील,  राजू मुंबईकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  त्यांच्या सहचारिणी , रोटरीयन  राणी ताई मुंबईकर ( व्हाईस चेअरमन उरण,पनवेल,कर्जत शिक्षक पतपेढी )सोबत त्यांच्या दोन कन्या वैष्णवी आणि सृष्टी मुंबईकर ,नितेश मुंबईकर, कॉंन संस्थेचे सेक्रेटरी महेश पाटील तसेच त्यांचे सहकरी गोल्डन ज्युबली मंडळ सारडेचे अध्यक्ष  नवनीत पाटील ,अनिल घरत सोबत सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष  संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील यांनी सुद्धा आवर्जून हजर राहून ह्या श्रमदानात आपलं अमूल्य योगदान दिले.
सदर  सिमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता बांधल्यामुळे इथले आदिवासी बांधव इतके खुश झाले होते कि त्यांनी कामाच्या ठिकाणी अक्षरशः नाचून आणि गाणी गाऊन आपला आनंद व्यक्त केला. हा रस्ता ज्यांनी स्वखर्चाने बांधून  दिला त्या राजू मुंबईकर यांचे आदिवासी बांधवांनी अगदी मनाच्या अंतःकरणा पासून धन्यवाद मानून आभार व्यक्त केले. माणसातल्या माणुसकीच्या घट्ट विणेतून बनविलेला हा सुखकर मार्ग नक्कीच त्या आदिवासी बांधवांच्यां आयुष्यात एक वेगळाच आनंद देत राहील एवढं मात्र नक्की.नव्या रस्त्याने आदिवासीच्या जीवनात एक वेगळाच आनंद निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 73 = 75