20210730 165739
कोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक

पनवेल महावितरणचा महाभ्रष्टाचार… सर्वसामान्य वीज ग्राहकांची  लूट तर तर मॉल्स, बार, शोरुमला सूट

पनवेल महावितरणचा महाभ्रष्टाचार

सर्वसामान्य वीज ग्राहकांची  लूट तर तर मॉल्स, बार, शोरुमला सूट

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल महावितरणाच्या अजब कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विद्युत अधिनियम कायद्याची पायमल्ली करत अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती जबरदस्ती वसूली करण्याचे काम जोरात सुरु आहे. 
वास्तविक विद्युत अधिनियमातील कलम 56 मधील तरतूदीनुसार वीज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही तर वीज कंपनीने ग्राहकास 15 दिवसांची वीज खंडीत करण्याबाबतची नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही ग्राहकाने वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करता येतो. मात्र कुठलीही नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडीत करणे हे बेकायदेशीर असून संबंधित वीज कंपनी न्यायालयीन कारवाईस पात्र ठरते. पनवेलमध्ये कोणत्याही वीज ग्राहकाला अशी नोटीस दिली जात नाही किंवा वीज खंडीत करत असल्याची पूर्वकल्पनाही दिली जात नाही. बेकायदेशीर वीज खंडीत करणार्‍या या संबंधित अधिकार्‍यांविरोधात संचालक मंडळाकडे तक्रार करुन न्यायालयातही दाद मागण्याच्या तयारीत पनवेलमधील वीज ग्राहक आहेत.
एखाद्या महिन्याचे बिल न भरल्यासही वीज पुरवठा खंडीत केला जात आहे त्यामुळे नाईलाजाने ही भरमसाठ आलेली बिले भरल्याशिवाय सर्वसामान्य माणसाकडे पर्याय उरलेला नाही. पूर्वी बिलांवर मीटरचा फोटो येत असल्याने रिडींग बरोबर आहे की नाही ते समजत होते, मात्र आता कोरोनाचा बहाणा करुन वीज मिटरचा फोटो बिलावर टाकला जात नाही. यामुळे ग्राहकांना किती युनिट वीज वापरली हे समजायला मार्ग नाही आणि याचाच फायदा घेत वापरापेक्षा जास्त युनिट दाखवून सर्वसामान्यांची लूट करण्यात येत आहे.


महावितरणच्या कार्यालयात जावून याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात तसेच तुमचे बिल बरोबर आहे ते तुम्हाला भरावेच लागेल असेही सांगण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांनी करायचे तरी काय असा प्रश्‍न पडला आहे. या उलट पनवेल महावितरणचे अधिकारी आर्थिक हितसंबंध जपत मोठमोठे मॉल्स, शोरुम्स, हॉटेल्स, हॉस्पीटल्स, बार यांना डायरेक्ट लाईन दिल्याने त्यांची बिले कमी येतात आणि ही तूट भरुन काढण्यासाठी सर्वसामान्यांवर बोजा टाकला जात आहे.
लॉक डाऊनमध्ये तर मीटरची रिडींगही न घेता सरासरी बिल देण्यात आली. मात्र ही सरासरी कशी काढली हे त्यांनाच माहित कारण जी बिले दिली ती नेहमीपेक्षा दिडपट किंवा दुप्पट होती. जर सरासरी काढली असेल तर एवढी तफावत कशी आली याचे उत्तरही महावितरणच्या कार्यालयात मिळत नाही. केवळ बिल बरोबर आहे तुम्हाला भरावेच लागेल हे एक ठराविक उत्तर मिळते आहे. ही वाढीव विजबिले सर्वसामान्यांचा खिसा खाली करत आहेत. लॉक डाऊनमुळे बंद पडलेले व्यवसाय, नोकरीवर आलेली गदा यामधून सावरण्याचा प्रयत्न करत असताना वीज बिलाचा बोजा मात्र सर्वसामान्यांना महागात पडत आहे. खरेतर कोरोना महामारीच्या परिस्थितीत महावितरणकडून सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा मिळणे अपेक्षित होते, मात्र दिलासा तर नाहीच उलट अंधाधुंदी बिले आकारुन  नाहक त्रास महावितरणकडून दिला जात असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्यांमधून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + = 15