खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार
उरण/ प्रतिनिधी :
19 वर्षाखालील लेदर क्रिकेट मध्ये रायगड च्या संस्कार म्हात्रे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संस्कार म्हात्रे यांचे सत्कार करण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान,बोकडविरा, तालुका उरण येथे आयोजित 21 व्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्कार म्हात्रे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभागप्रमुख भरत म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत.यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, जे एन पी टी विश्वस्त दिनेश पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.