WhatsApp Image 2022-01-05 at 7.52.54 PM (1)
अलिबाग कोकण सामाजिक

केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, प्रयत्न करा यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, प्रयत्न करा यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

अलिबाग/ प्रतिनिधी :
कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते. मात्र केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, छोट्या व्यवसायापासून सुरूवात करा, सातत्याने प्रयत्न करा अन्‍ यशस्वी उद्योजक बना, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच येथे केले.


“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, सुप्रशासन आणि कातकरी उत्थान अभियान” निमित्ताने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच शासनाच्या विविध रोजगार निर्मिती योजनांबाबत  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  श्री.नित्यानंद पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.अरूण पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वर्षा पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.श्यामकांत चकोर, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चे संचालक श्री.आनंद राठोड, समन्वयक मीना श्रीमाळी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.प्रदीप सावंत, स्व.शामराव पेजे कोकण महामंडळाचे श्री.रविंद्र दरेकर, कातकरी समाजातील रायगड जिल्ह्यातील पहिले ॲडव्होकेट श्री.रविंद्र पवार, विविध बँकांचे प्रतिनिधी, बचतगटाच्या महिला, आयटीआयचे विद्यार्थी, आरसेटीचे प्रशिक्षणार्थी, सामाजिक कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले की, राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे, या उद्देशाने शासनाची “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित आहे. उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या माध्यमातून 10 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे. “नो विंडो सिस्टम” ही संकल्पना आधारभूत मानून जिल्ह्यातून जास्तीत जास्त उद्योजक घडावेत, लहान उद्योजकापासून ते मोठे उद्योजक बनावेत, हाच या कार्यशाळेचा उद्देश आहे. शासनाच्या भरपूर योजना आहेत मात्र त्यांचा सूक्ष्म अभ्यास करून छोट्या उद्योगापासून सुरूवात करावी. उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व त्या प्रशिक्षणाचे शुल्क जिल्हा प्रशासन देईल.
आरसेटीमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांशी संपर्क करून त्यांना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी  जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, छोट्या व्यवसायापासून सुरूवात करा, सातत्याने प्रयत्न करा अन्‍ यशस्वी उद्योजक बना, असे पुन:श्च आवाहन करून उपस्थितांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  श्री.नित्यानंद पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.अरूण पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वर्षा पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.श्यामकांत चकोर, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चे संचालक श्री.आनंद राठोड, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.प्रदीप सावंत, स्व.शामराव पेजे कोकण महामंडळाचे श्री.रवींद्र दरेकर यांनी त्यांच्या विभागातील उद्योजक विषयाशी संबंधित असलेल्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थित भावी उद्योजकांना दिली. तर बँक ऑफ इंडियाचे श्री.नवीन बोगम यांनी बँकांची कर्ज प्रकरणे मंजूरीची कार्यवाही, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत प्रमोद पाटील यांनी स्वत: घडविलेली ब्रॉस कॉपर (मीना वर्क)ची भेटवस्तू देवून करण्यात आले. उपस्थितांना श्री रामेश्वर महिला बचतगटाच्या महिलांनी बनविलेला अल्पोपहार आणि चहाच्या ऐवजी अनुप दाबके यांनी तयार केलेली विशेष कॉफी देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात काही लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी श्री रामेश्वर महिला बचतगटाच्या शलाका सतिश राऊत, ओमकार महिला बचतगटाच्या सुमन सुरेश खडपे, बँक ऑफ इंडियाचे अजय प्रकाश पाटील, फळ प्रक्रिया उद्योग समूहाच्या श्रीमती स्मिता प्रशांत वैद्य यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव क्षितीज वैद्य, श्री.प्रमोद विष्णू पाटील, श्री.राजन भगत, श्री.परशुराम पवार, श्री.अनुप दाबके, मीनाक्षी माळी, आनंद सानप यांनी यशस्वी उद्योजक बनण्याविषयीचा त्यांचा सुरू असलेला प्रवास आपल्या मनोगतातून उपस्थितांसमोर मांडला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.अरूण पवार यांनी तर आभार प्रदर्शन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 3 = 5