नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मद्यधुंद व्यक्तीकडून मध्यरात्री मारहाण
कर्जत/ नितीन पारधी :
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रात्रीच्या सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्याला मध्यरात्री आलेल्या तीन मध्यधुंद व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाने नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून सर्व थरातून त्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकाराने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी घाबरले आहेत.
२४ जुलै च्या रात्री भगत हे सेवा बजावत असताना मध्यरात्री तीन तरुण तेथे आले आणि त्यांनी सरकारी दवाखान्याबाहेरून जाताना तेथे भगत या सुरक्षा रक्षक यांना हटकले आणि सरकारी दवाखाना तुझ्या बापाचा आहे काय? दरवाजा उघड अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न त्या तिघांनी सुरक्षारक्षक भगत यांना केला.त्यावेळी रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेत असल्याने आत येऊ न्याय अशी विनवणी सुरक्षारक्षक भगत करीत होते. मात्र मद्यधुंद असलेल्या त्या तीन तरुणांनी सुरक्षा रक्षक दयानंद भगत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर त्यापैकी एका तरुणाने जमिनीवर पडलेल्या भगत यांच्यावर दगड उचलून मारहाण केली आणि त्यात सुरक्षा रक्षक भगत हे रक्तबंबाळ झाले आणि त्यानंतर बाहेरचा आरडाओरडा बघून दवाखाण्यात असलेले रुग्णांचे नातेवाईक बाहेर आपले असता ते तिघे तरुण नेरळ एसटी स्टॅन्ड कडे पळून गेले.