नेरे जवळ खडडयांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी
नवीन पनवेल/ प्रतिनिधी : नेरे येथील पोलिस चौकी ते बँक ऑफ इंडिया शाखा नेरे येथील रस्त्यातील खड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेला माती चा भराव (साईड पट्टी) खचलेली आहे. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील काम त्वरित करण्याची मागणी मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.
एक ते दिड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नेरे येथील बसस्थानक मुख्य बाजारपेठ चौक असलेला पोलिस चौकी ते बँक ऑफ इंडिया, शाखा नेरे येथे अंदाजे १०० मीटर रस्त्याचे सिमेंट कांक्रीटीकरण करून काम पूर्ण करण्यात आले. सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु ६ ते ८ इंच कांक्रीटीकरणामुळे मुख्य डांबरीकरण असलेला रस्ता व कांक्रीटीकरण केलेला रस्ता याच्यामध्ये ३ ते ४ इंच उंचीचा फरक पडला. कांक्रीटीकरण केलेला रस्ता व मुख्य डांबरीकरण असलेला रस्ता यांच्यामधील टप्प्याचे काम न करताच सदरचा रस्ता रहदारीसाठी सुरू करण्यात आला. रहदारीमुळे हा टप्पा खड्डेमय झालेला आहे. प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खडयांमुळे सकाळी व संध्याकाळी तेथे वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी होते. तसेच अंदाजे १०० मीटर सिमेंट कांक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेला मातीचा भराव (साईड पट्टी) खचलेली आहे. तरी संबंधित ठेकेदारास सूचना करून सदरचे काम लवकरात लवकर करून घेण्याचे निवेदन मनसेचे दिनेश मांडवकर-पनवेल तालुका सचिव, विश्वास पाटील -पनवेल तालुका उपाध्यक्ष, विद्याधर चोरघे-नेरे विभाग अध्यक्ष यानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.