जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ
पनवेल / प्रतिनिधी :
गेली नऊ ते दहा वर्षे रखडलेला जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत. पनवेल शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले जुने तहसील कार्यालय जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असल्याने ते अपूर्ण अवस्थेत आहे. याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडळ कार्यालय आहे. येथील कचरा बाहेर उघड्यावर टाकला जातो. मोठ्या प्रमाणात कचरा येथे साचलेला आहे. तसेच पाण्याच्या रिकाम्या वाटल्या देखील टाकण्यात येतात, सायंकाळी येथे मद्य पार्टी रंगत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दारूच्या बाटल्या देखील या कचऱ्यात पडलेल्या दिसतात. कित्येक वर्ष रखडलेले हे प्रशासकीय भवन कधी सुरू होणार याकडे पनवेलवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. २०१३ पासून प्रशासकीय भवनाच्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात केल्यापासून अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. सदरचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल यांच्यामार्फत ठेकेदारास देण्यात आले होते, मात्र दिलेली मुदत संपूनही अद्याप बांधकाम पूर्ण झाले नाही. पनवेल शहर पोलीस ठाणे, सब रजिस्ट्रार कार्यालय, वनखाते, तहसील कार्यालय आदी कार्यालये या नवीन जागेत स्थलांतरीत होण्यास उत्सुक असताना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या व लोकप्रतिनिधींच्या वेळकाढु धोरणामुळे ही इमारत अपूर्ण अवस्थेत आजही पनवेलकरांना पाहायला मिळत आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे, तहसिलदार कार्यालय सध्या साईनगर परिसरात आहे, तर सब रजिस्ट्रार कार्यालय पनवेलमधील अमरधाम येथे व नवीन पनवेल येथे विखुरलेले आहे. तर तक्का येथे वनखाते आहे. शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याशेजारी असलेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात कचरा कचरा साचलेला दिसून येत आहे. तलाठी, मंडळ कार्यालयाच्या खिडकीतून हा सर्व कचरा येथे टाकण्यात येतो. यात अनेक कागदपत्रे फाडलेल्या अवस्थेत आहेत. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या देखील टाकून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे परिसर घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.