कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड
पनवेल/आदिवासी सम्राट :
लहानपणापासून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असल्यास ते स्वप्न मोठेपणी नक्कीच साकार होते, याचा प्रत्यय पनवेल तालुक्यातील कोल्ही येथील पोर्णिमा नाईक यांना आला. त्यांनी एम.पी.एस.सी.ची परीक्षा देत कर सहाय्यक पदी त्यांची निवड करण्यात आली, या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
पौर्णिमा समीर नाईक ह्या एम.पी.एस.सी. मधून महसूल सहाय्यक तसेच कर सहाय्यक अशा दोन्ही पदी त्यांची निवड झाली आहे. त्यांचा जन्म पनवेल मधील वावंजे या गावात झाला असून लहानपणा पासूनच त्यांना शिक्षणाची फार आवड होती. शाळेत वक्तृत्व, क्रिडा स्पर्धामध्ये त्या नेहमी भाग घेत असत. लहानपणापासून वडिलांचे छत्र नसल्याने त्यांचा सांभाळ तसेच संपूर्ण शिक्षण मामा भगवान सांगडे आणि मामी रोशनी सांगडे यांनी अगदी स्वतःच्या लेकीप्रमाणे केला. या यशात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे पौर्णिमा यांनी सांगितले. त्यांची आई अंगणवाडी सेविका असून मामी शिक्षिका आहेत. त्यांच्याकडे बघूनच स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. पौर्णिमा यांचे प्राथमिक शिक्षण वावंजे गावातच झालं पुढे गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी एमपीएससीची तयारी सुरू केली. अभ्यास सुरू असतानाच त्यांचं लग्न झालं. बरेचदा लग्नानंतर मुलींचं स्वप्न, करिअर थांबत पण पौर्णिमा बाबत तसं झालं नाही. कारण त्यांच्या स्वप्नांना आकार देणारी सासरची माणसं होती. सासरे प्रकाश नाईक तसेच सासूबाईं सुगंधा नाईक यांनी त्यांना खंबीर पाठिंबा दिला. लेकीला तर सर्वच जण साथ देतात पण सुनेच्या स्वप्नांना बळ देणारे हे पहिलेच असावेत.
२०२१ च्या पूर्व परीक्षेत पौर्णिमाला अपयश आले, त्यामुळे त्या खूप खचून गेल्या. मात्र कुटुंबाने पुन्हा प्रयत्न कर म्हणून सांगितले. २०२२ आणि २०२३ दोन्हीच्या पीएसआय या पदासाठी पूर्व परीक्षा पात्र झाली. परंतु गरोदर असल्याने शारीरिक चाचणी न देता आल्याने माघार घेतली. यासर्व प्रवासात तिचे पती समीर नाईक तिच्या पाठी उभे होते. २०२३ मध्ये ती कर सहाय्यक पदासाठी पूर्व परीक्षा पात्र ठरले, गरोदर असताना देखील अभ्यास केला आणि मुख्य परीक्षा देखील पात्र झाले, त्यानंतर खरी कसोटी होती ती म्हणजे कौशल्य चाचणीची. बाळ लहान असताना तिला टायपिंग करायचे होते. यावेळी मुलगा ३ महिन्याचा असताना कौशल्य चाचणी दिली आणि पात्र झाले. त्यानंतर महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक पदी ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरी निवड झाली. यापुढे अभ्यास असाच सुरू ठेवून राज्यसेवेतून पद मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असे हि पौर्णिमा यांनी सांगितले.