20191011 131851
खारघर नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

बिजांकुर कंपनीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

  • दीडशे ठेवीदारांच्या तक्रारी दाखल..
  • कोट्यवधी रुपयांची फसवणूक..

……………………………………..
फसवणूक झालेल्यांनी खारघर पोलिसांशी संपर्क साधावा

बिजांकूर ग्रुप ऑफ कंपनीमध्ये ज्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या परताव्याची रक्कम मिळालेली नाही त्यांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत घेऊन खारघर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन खारघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.
……………………………………

खारघर/ प्रतिनिधी :
गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमीष दाखवून मुदतीत ठेवीचा परतावा न करता शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी बिजांकूर ग्रुप ऑफ कंपनीविरोधात फसवणुकीसंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपीना अटक केली असून चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र ज्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या परताव्याची रक्कम मिळालेली नाही त्यांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत घेऊन खारघर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन खारघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.
सरकारच्या कोणत्याही वित्तीय संस्थेची परवानगी न घेता सामूहिक गुंतवणूक योजना सुरू करणाऱ्या तसेच गुंतवणुकीवर दुप्पटीने व तिप्पटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून शेकडो ग्राहकांना बीजांकुर कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या बिजांकूर ग्रुप ऑफ कंपनीने शेकडो ग्राहकांना मॅच्युरिटीच्या तारखेनंतरही त्यांची रक्कम परत केली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या कंपनीच्या सहा जणांवर फसवणुकीसह अपहार तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबधाचे संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बीजांकुर कंपनीकडून व्यवसायामध्ये तसेच जागेमध्ये गुंतवणूक करते. तसेच त्यातून मिळणारा नफा आपल्या सभासदांना देते, असे सांगून या कंपनीने सामूहिक गुंतवणूक योजना सुरू केल्या होत्या. या कंपनीच्या दलालांनी पनवेल, कामोठे, खारघर, तळोजा, कल्याण, शिळफाटा परिसरात आपले जाळे पसरवले होते. या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांची रक्कम दुपटीने व तिपटीने देण्याची योजनाही आणली होती.
बँकांकडून मिळणाऱ्या व्याजापेक्षा बीजांकुरकडून मिळणाऱ्या मॅच्युरिटीची रक्कम अधिक असल्याचे आमिष दाखवले होते. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक ग्राहकांच्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या ग्राहकांनी खारघर येथील कार्यालयात धाव घेतली. मात्र खारघर येथे समाधान न झाल्यामुळे खातेदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी खारघर पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांची भेट घेत. त्यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तीदार यांनी नागरिकांच्या येणाऱ्या फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीनुसार बिंजांकुर कंपनीतील संचालक व इतर आरोपी यांच्याविरोधात गुन्हा रजि. क्रमांक 303 /2019 420,406,409,120 ब सह एम.पी आय.डी कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पर्यन्त खारघर पोलीस ठाण्यात दीडशे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार फसवणुकीची रक्कम 80 लाखाच्या आसपास गेलेली आहे. मात्र हि फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन आरोपीना अटक केली आहे. मनोज भोईर वय 32 रा. शिलगाव, शिळफाटा, पांडुरंग पावशे वय 50 रा.शिलगाव, शिळफाटा याठिकाणी राहत असून यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 5 = 1