महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे 15 एमएलडी पाणी महापालिकेला वाढवून देण्याची मागणी
पनवेल संघर्ष समितीचे सी. वेलरसू यांना पत्र
—————————————————–
सुरक्षा रक्षक नियुक्तीची मागणी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही जीवनवाहिनी पनवेलपासून जेएनपीटी, कळंबोली, सिडकोचा काही भाग आणि 29 गावांची तहान 34 किलो मीटर अंतराच्या जलवाहिनीतून भागवत आहे. परंतु, जीर्ण झालेली वाहिनी, टँकर माफिया, झोपडपट्टी आणि वीट व्यावसायिक जलवाहिन्यांची तोडफोड करीत असल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत आहे. शिवाय या घटनांतून अब्जावधी लिटर पाण्याची नासाडी होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी एमजेपीने 24 तास निगराणी आणि गस्त ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक अथवा त्यांच्या कामगारांची नियुक्ती करावी तसेच जलवाहिनी तोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशीही मागणी संघर्ष समितीने केली आहे.
————————————————-
पनवेल/ प्रतिनिधी :
शहरात आतापासून महापालिकेने केलेली पाणी कपात लक्षात घेऊन पनवेल संघर्ष समितीने पाणी टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रमुख सचिव सी. वेलरसू यांच्याकडे 15 एमएलडी पाणी वाढवून देण्याची मागणी केली आहे. तसे लेखी पत्र समितीने त्यांना पाठविले आहे. त्यावर पनवेलकरांची टंचाई दूर करणारा निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी व्यक्त केली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच आता पनवेलकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून एप्रिल-मे महिन्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी महापालिकेने नियोजनाचा भाग म्हणून चार विभागात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद धोरण राबवणे सुरू केले आहे. त्या प्रमाणे विभागवार पाणी कपात सुरू केल्याने नागरिकांनाही पाणी नियोजन करावे लागणार आहे.
सद्य:स्थितीला पनवेल शहाराला महापालिकेच्या मालकीचे देहरंग धरणच वरदान ठरत आहे. धरणातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. धरण गळती, नादुरूस्ती आणि पंधरा वर्षापासूनचा धरणात साचलेला गाळ ही पनवेलकरांच्या पाणी नियोजनातील प्रमुख समस्या आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आजमितीला 4 एमएलडी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 6 एमएलडी पाणी महापालिकेला विकत देत आहे. महापालिका धरणातून दररोज 10 एमएलडी असे फक्त वीस एमएलडी पाणी पुरवते. एकट्या पनवेल शहराला 29 एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यातही आतापासून पाणी कपात सुरू केल्याने पुढच्या काही महिन्यात पाणी टंचाई ऊग्ररूप धारण करणार आहे. त्यावर उपाय योजना करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रमुख सचिव सी. वेलरसू यांना पनवेल संघर्ष समितीने साकडे घालून आणखी 15 एमएलडी पाणी महापालिकेला दररोज वाढवून द्यावे, अशी विनंती एका पत्राद्वारे केले आहे. हे पत्र त्यांना ई-मेल केले असून ते त्यांना मिळाल्याची खातरजमाही समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी करून घेतली आहे.
या पत्राच्या प्रति एमजेपीचे मुख्य अधीक्षक सी. आर. गजभिये, मुख्य अभियंता व्ही. आर. सूर्यवंशी, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पाणी पुरवठा अधिकारी वाड यांनाही पाठवली आहे.