पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा!
सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती
पनवेल/ प्रतिनिधी :
मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात आहे, शिवाय या भागामध्ये आदिवासी समाजाची अधिक लोकवस्ती असल्याने तालुक्यात आदिवासी ग्रामपंचयात म्हणून ओळखली जातेय.
या मालडुंगे ग्रामपंचायतमध्ये कोंडीचीवाडी, टावरवाडी, सातीचीवाडी, कोंबलटेकडी, ताडपट्टी, मालडुंगे, धोदाणी, पिंपलवाडी, चिंचवाडी, वाघाचीवाडी, बापदेव, देहरंग, धामणी, हैाशाचीवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र, यातील काही गावांमध्ये दारू विक्री होतांना दिसत आहे. या दारूमुळे अनेक कुटुंबामध्ये भांडण होतात, तर काहीकांची कुटुंबच उध्वस्त होताना पाहतोय. एवढाच नाही तर दारूमुळे शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम देखील होतात.
या गोष्टींचा विचार करून ग्रामपंचायत हद्दीतील दारू बंद करण्यासाठी नवनिर्वांचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने पहिल्याच सभेत विषय घेवून ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम चौधरी, ग्रामसेवक सुरेश मोहिते यांना सांगत पोलीस विभागाला देखील ग्रामपंचायातीने दारू बंद करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यासाठी विनंती केली आहे. व तसे लेखी पत्र देखील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये दिले आहे.