20200331 174201
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शहरात प्रवेश बंद! किराणा सामान आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन 

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शहरात प्रवेश बंद

किराणा सामान आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन 

पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असतानाच याची लागण झाली असल्याचे तब्बल 15 दिवसानंतर समोर येत असल्यामुळे या 15 दिवसात अनेकांना लागण होण्याची चिन्हे असल्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देश लॉक डाउन केला. मात्र शहरी भागातील गर्दी आटोक्यात येण्याचे नाव घेत नसल्यामुळे अखेर पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलीत नागरिकांना दमदाटी करावी लागत आहे. त्यातच शहरी भागाबाहेरील ग्रामीण भागातील नागरिकांच्या झुंबड शहरात दाखल होऊन दुकानांवर गर्दी करताना दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकापूर येथे नाकाबंदी करून ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागात प्रवेश करण्यावर बंदी आणण्यात आली.
यावेळी आदई, विचुंबे आणि नेवाळी याठिकाणाहून येणाऱ्या सर्व नागरिकांची गरज ओळखूनच त्यांना प्रवेश देण्यात येऊन तसेच इतरांना पुन्हा मागचा रस्ता दाखविण्याची मोहीम आखण्यात आली. यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कडेकोट बंदोबस्त करून आपली काळजी घेत आहे हे नागरिकांनी ओळखणे गरजेचे असून नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनि श्याम शिंदे यांनी केले आहे.