गुरे चोरणारा टेम्पो पकडला
पनवेल/ आदिवासी सम्राट :
पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो 15 सप्टेंबर रोजी पहाटे पकडण्यात आला. मात्र गुरे चोरणारी टोळी पळून गेली. अशा गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
पनवेल मध्ये अनेकदा गुरे चोरून नेऊन त्यांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण भागात जाऊन हे चोरटे गुरे चोरून नेतात. 15 सप्टेंबर रोजी पहाटे गुरे चोरून नेणारा टेम्पो येथील नागरिकांनी पकडला. मात्र ही गुरे चोरणारे चार ते पाच जण पळून गेले. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. मोरबे परिसरातील आदिवासी वाडीतील टेम्पोमध्ये मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास गुरांना टेम्पोमध्ये भरून ती घेऊन जात असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यानुसार नागरिक मोरबेजवळ सतर्क राहिले. यावेळी एक रिक्षा आणि टेम्पो घेऊन हे चोरटे आले होते. या रिक्षामध्ये एक महिला देखील होती. त्यांनी टेम्पोचालकाला सतर्क केले आणि मोरबे गावाजवळ काही नागरिक उभे असल्याचे सांगितले. त्यामुळे टेम्पो चालक सतर्क झाला आणि त्याने टेम्पोमध्ये असलेल्या वासरू, गाय आणि बैल यांना टेम्पो सह त्या ठिकाणी सोडून ते सर्वजण गवतातून पळून गेले. गोरक्षक तेजस नावडेकर, जगदीश गाडगे, सतीश फडके, प्रणाल फडके, किशोर पाटील, बाळू गाडगे, रोशन फडके, सुयश नावडेकर यांच्यामुळे चोरांचा गुरे चोरीचा डाव फसला आहे. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. त्यानंतर या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली. पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.