आपले तेच……. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली
पनवेल/ विशेष प्रतिनिधी :
गेल्या अठरा दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनमताच्या अपमान भारतीय जनता पक्षाने केल्याचे समोर आले आहे. सन २०१४ साली भाजपच्या हाती १२२ जागांवर आमदार निवडून दिले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढले होते. यावेळी शिवसेनेला ६३ आमदार निवडून अंत आले होते. तसे पाहायला गेले तर एकूण १८५ आमदार हे युतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी दिले होते. मात्र सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने युतीला महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले होते त्या अनुषंगाने २०१९ च्या निकालातही त्याहीपेक्षा अधिक आमदार येण्याची गरज होती. मात्र असे न होता महाराष्ट्रातील जनतेने सन २०१९ च्या विधानसभेत केलेल्या मतदानावरून भाजप सरकारला त्यांची जागा दाखविली तर शिवसेनेने स्वतंत्र न लढल्याबद्दल त्यांच्याही जागांमध्ये घट केली. आणि यावेळी दोन्ही पक्षांमध्ये झालेली घट आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पारड्यात काही आमदारांची वाढ ही महाराष्ट्राच्या जनतेने केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात त्रिशंकू सरकारची गरज आणि भाजपला रॅम रॅम ठोकण्याची तयारी ही महाराष्ट्रीय मतदारांनी केली होती. मात्र ज्या पद्धतीने भाजपला राज्यपालांनी १५ दिवसांचा अवधी दिला होता आणि नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली मुदत ही अवघी २४ तासांसाठी दिल्यामुळे हे भाजप पुरस्कृत राष्ट्रपती राजवट असल्याचे चित्र जनतेच्या समोर आले आहे.
भाजपने आपल्याला सत्ता नाही तर कोणालाही नाही ही हेकेखोर वृत्ती ठेवल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत महाराष्ट्रातील जनतेमध्ये अजूनही काही प्रमाणात द्वेष निर्माण होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणूक लागणार म्हणजे त्यावर केला जाणारा खर्च हा थेट महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरच पडणार आहे. भाजपच्या मनमानीमुळे महाराष्ट्रातील जनता मोठ्या आर्थिक हानीला सामोरी जात असल्यामुळे निवडणूक लागल्यास भाजपला महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे. मात्र केंद्रातील भाजपा सरकारने निवडणुकांमध्ये आपल्या पॉवरचा गैरवापर करायला नको म्हणजे मिळविलं, अशी भावना आज महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. कारण जनतेने ज्या पद्धतीने भाजपला नाकारले त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही भाजपला नाकारले आहे. खरंतर तीन वेगवेगळ्या पक्षांचे विचार हे भाजपला घालविण्यासाठी एकत्र येऊ शकत असतील तर मात्र भाजपच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरून जनतेची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे आज आपले तेच खरे करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लागू केली आहे त्याचा मोबदला त्यांना याच ठिकाणी चुकवावा लागणार आहे. कारण महाराष्ट्राची जनता दूधखुळी असल्याची भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत झाली आहे. भारतीय जनता पक्षाने एव्हीएमचा घोळ केला नाही असे चित्र उभे करण्यासाठी आपलेच डोईजड होणाऱ्या मंत्र्यांचे पंख कापण्याचा त्यांनी प्रकार केला आहे. यामध्ये त्यांचे आमदार संख्या कमी झाली आणि पर्यायाने त्यांना सत्तास्थापन करण्यासाठी अडचणी जाणवू लागल्या. आणि निवडणुकांचा निकाल हा सर्वच पक्षांच्या बाजूने योग्य लागला असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे ईव्हीएमचा घोळ नसल्याचे चित्र उभे राहिले. मात्र हे भाजपचे सर्व खेळ जनता जनार्दन जाणून असल्यामुळे राष्ट्रपती राजवट कायम राहताना निवडणूक लागल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरलेल्या भाजपा सरकारला महाराष्ट्राची जनता आपली जागा दाखवून देणार आहे.