हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक
पनवेल /आदिवासी सम्राट :
मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने आज भव्य मिरवणुक उत्साही वातावरणात संपन्न झाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीला दर्गाचे मुख्य ट्रस्टी जावेद इब्राहिम फकीर मुजावर आणि सिजान मुजावर यांनी दोघांना पुष्पहार, मानाची टोपी आणि शाल देऊन सन्मानित केले. भारत देश विविध परंपरा आणि अनेक जाती धर्माने परिपूर्ण देश आहे. हजारो वर्षांची ऐकतेची, मानवतेची परंपरा आपल्या देशाला आहे. त्यामुळे असे उत्साह सर्व धर्मात साजरे होतात.या मधून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होते.इस्लामचा खरा मानवतेचा संदेश लक्षात घेणं महत्वाचे आहे. मोठी आध्यत्मिक परंपरा असलेला हा धर्म अशा उत्सवांमुळे सामान्य जनतेला कळतो. असे भावपूर्ण प्रतिपादन नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.दर्गा ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती यावेळी सय्यद अकबर यांनी सांगितली. दरवर्षी होणारा हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक जोमाने होतो आहे.अशी माहिती सय्यद यांनी दिली. मिरवणुकीच्या सुरुवातीला सय्यद अकबर यांच्या भाषणाने आणि जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
इस्लामच्या सकारात्मक बाबी आणि मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचे फलक घेऊन युवक वर्ग तन्मय होऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. लहान लहान मुले खुप सुंदर वेशभूषा करून घोड्याच्या रथा मधून सहभागी झाल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली होती.दुपार पासून शेकडो लोक या उत्सवात सहभागी झाले होते.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न या मिरवणुकीचे सर्व लोक कौतुक करताना दिसत होते.दर्गा पासून स्टेशन रोड परिसर आणि सगळीकडे मिरवणूकीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.