रास्त भाव धान्य दुकानातून मिळतंय कमी धान्य; आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती
पनवेल/ आदिवासी सम्राट :
सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे.
नुकताच पनवेल विधानसभा मतदार संघातील नेरे गावात आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘गाव चलो अभियानातंर्गत’ भेट दिली होती. त्यावेळी एका वस्तीला भेट दिल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना रेशन दुकानातून ५ किलो धान्य ऐवजी ३ किलो तांदुळ व १ किलो गहू असे ४ किलोच धान्य मिळत असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी गावातील इतर लोकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सरकारच्या माध्यमातून रास्त भावात धान्य दिला जात असताना रेशनींग दुकानदारांकडून मात्र शिधा पत्रिका धारकांना कमी प्रमाणात धान्य दिले जात आहे. त्यामुळे याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना त्यांचे धान्य योग्य प्रमाणात मिळवून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पुरवठा शाखेतून प्रत्यक्षात किती धान्य वाटप होते ? याची माहिती तसेच ५ किलो धान्य देण्याऐवजी कमी धान्य नागरिकांना देण्यास कोण जबाबदार याचा तपास करून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपण काय? कारवाई केली, याची माहिती दयावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून कळविले आहे.