पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर
पनवेल/ आदिवासी सम्राट :
गेल्या 15 वर्षात पनवेलमधील नागरी समस्या वाढल्या असतानाही त्या सोडविण्यास येथील आमदार अपयशी ठरले असल्याने या समस्या सोडवून स्वच्छ व सुंदर पनवेल करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघातून रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षाच्या साथीने ही निवडणूक लढत असलेले संतोष पवार यांना विजयी करा, असे आवाहन आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज पनवेल येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यासह उमेदवार संतोष पवार, अमित गायकवाड, पंचशिल शिरसाट, पुष्पांजली सपकाळ, सुधीर पवार, जमील पठाण, सोहेल खलिफा, विकी थॉमस, अदनान अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवार संतोष पवार हे सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचारार्थ बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की, पनवेल विधानसभेमध्ये अनेक नागरी समस्या असतानाही त्या सोडविल्या जात नाहीत. येथील नैनाचा प्रश्न शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या मार्फत जी घरपट्टी आकारली जाते ती ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे खाजगीकरणाला प्राधान्य दिले जात असून, तरुणांची बेरोजगारी, ड्रेनेज सिस्टीम, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांना पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी, नियोजनाचा अभाव या गोष्टी असूनही येथील सत्ताधारी फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्याचे काम करतात का? असा सवाल करीत पनवेलची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उड्डाण पुल उभारणे गरजेचे आहे. आगामी विमानतळाला दि.बा.पाटील साहेबांचे नाव लागलेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचा व आमचा मित्र पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहील व यासाठी रस्त्यावर उतरु, वेळ पडल्यास आंदोलन करू, लवकरच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून त्याद्वारे पनवेलकरांना सुखसुविधा आमचा उमेदवार निवडून आल्यावर दिल्या जातील याची माहिती सुद्धा यात देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संतोष पवार यांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे.