Img 20200106 Wa0037
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित; वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान.

पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना
जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित.

वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान.

——————————–
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. बाळाराम पाटील, आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, जेष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पञकार दिनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न.
—————————-
या जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित…
जेष्ठ पत्रकार विजय कडू, माधव पाटील, प्रमोद वालेकर, आणि सुनील पोतदार यांचा समावेश
—————————-
या वृत्तपत्र विक्रेत्यांचा करण्यात आला सन्मान….
वसंत पप्पू काळंगे, महेश ठक्कर, अविनाश पडवळ, मंगेश फडके
——————————-

पनवेल/ प्रतिनिधी :
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. यानिमित्ताने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील जेष्ठ पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी खा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्व.ल.पा.वालेकर जीवन गौरव पुरस्कार पनवेलमधील जेष्ठ पत्रकार तथा वादळवारा वृत्तपत्राचे संपादक विजय कडू यांना प्रदान करण्यात आला. तसेच आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते पनवेलमधील दैनिक सागरचे जेष्ठ पत्रकार माधव पाटील यांना स्व.शशिकांत गडकरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले. यावेळी दैनिक किल्ले रायगड वृत्तपत्राचे संपादक प्रमोद वालेकर यांना स्व.भरत कुरघोडे जीवन गौरव पुरस्काराने आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते तर दैनिक रायगड नगरीचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांना स्व.मधुकर दोंदे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पनवेलमधील पत्रकारांचे आधारस्तंभ तसेच ऊन, पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या आणि वृत्तपत्राचा दर्जा वाढविण्यासाठी हातभार लावणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी माजी खा. लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. बाळाराम पाटील, आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, शेकापचे पनवेल महानगर पालिका चिटणीस गणेश कडू, दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, वृषाली वाघमारे, ऍड. मनोज भुजबळ, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, काँग्रेसचे सुदाम पाटील, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपविभागीय दत्तात्रय नवले यांनी बोलताना सांगितले, लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान अभेद्य आहे. जगात पत्रकारांनी दिलेले योगदान पाहता, त्यांनी या लोकशाहीमध्ये आपले स्थान निर्माण करून लोकशाहीचा स्तंभ हा चौथा स्तंभ म्हणून नावारूपाला आणला. आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र स्थापन करण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत. यामध्ये ब्रिटिश काळात पश्चिम बंगालमध्ये निळीसाठी आंदोलन झाले, तेथील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नीलदर्पण नावाचे नाटक समोर आणले आणि त्याची पत्रिका प्रकाशित करण्यात आली आणि त्यातून संपूर्ण भारतात सुरु झाले दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाले. ब्रिटिश काळापासून सुरु असलेल्या पत्रकारितेवर अनेक संकटे आली, विविध पत्रकारांच्या लेखणीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सर्व अन्यायावर मात करून आज पत्रकारितेने आपले पाय घट्ट रोवून ठेवले आहेत. यावेळी दत्तात्रय नवले यांनी पत्रकार आणि पत्रकारिता यावर खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी बोलताना सांगितले की, दर्पण या नावातच सर्व काही आहे, त्या काळातील पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये स्वरूप बदलले गेले आहे, अशामध्ये पत्रकारांमध्ये विश्वासार्हता आहे की नाही याला अधिक महत्व आहे. आज राजकारण पुढे चाललेय आणि मीडिया त्यांच्या पाठीमागे धावत आहे, याचे कारण पत्रकारितेचा व्याप वाढला आहे. मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढले आहे. आज मीडिया समोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश येऊन पत्रकारांचा आधार घेतात, म्हणजे आज पत्रकारिता फार मोठी झाली आहे. पत्रकारांवर अनेक अन्याय होत असतात, मात्र कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची धमक पत्रकारांमध्ये आहे.
यावेळी कोकण शिक्षक मतदार संघांचे आ. बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले की, पनवेलच्या जेष्ठ पत्रकारांना सन्मानित करून पानवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने स्तुत्य उपक्रम राबविला आहे, समाजातील घटकांनी केलेल्या बारीक सारीक घटना, कार्यक्रम संपूर्ण वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करीत असतात. पत्रकारांनी आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये कायम ठेवले आहे. पनवेलच्या सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार यांनी केलेल्या कामांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. ज्या दिवंगत पत्रकारांच्या नावाने हे पुरस्कार दिले आहेत त्या दिवंगत पत्रकारांचे योगदान पनवेलसह रायगड जिल्ह्याला लाभले आहे. त्यामुळे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे त्यांनी आभार मानले. तसेच त्यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, पनवेलमधील पत्रकारांनी झोकून जाऊन काम केलं आहे, या प्रवासामध्ये आपण केलेल्या कामामुळे आज पनवेल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रगत बनत चालले आहे, नवीन साधनं आली आहेत, आज पत्रकारिता क्षेत्रातील नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी आपण सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आलं आहे. आपल्याकडून पनवेलमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत राहण्याच्या शुभेच्छा त्यांनी यानिमित्ताने दिल्या.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीला 10 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे आपल्याला द्याव्या तितक्या शुभेच्छा कमीच आहेत, आज पनवेलच्या इतिहासात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे आणि आज माझ्यासमोर तिसरी पिढी पत्रकारिता क्षेत्रात उतरली आहे, मात्र आजही तोच उत्साह पत्रकारिता क्षेत्रात दिसत असल्यामुळे पत्रकारिता हे एक वेगळं रसायन आहे, समाज सुधारण्याचे हे रसायन आजच्या पिढीनेही अंगिकारले आहे. आज पनवेलमध्ये पत्रकारांची संख्या वाढली आहे, आणि त्यामध्येही जो तो आपले स्थान कायम ठेवून असल्यामुळे त्यांचे कौतुकच करावे लागेल. आज इतक्या दिवंगत पत्रकारांसह जेष्ठ पत्रकारांनी दिलेल्या योगदानामुळे पत्रकारिता जीवंत राहिली आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे काम पत्रकार करीत आहेत, आज पत्रकारांना धावपळीचा सामना करावा लागतो, मात्र यावेळी पत्रकारांनी धावपळ करीत असताना आपले आरोग्य सांभाळण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, खजिनदार केवल महाडिक, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, साहिल रेळेकर, अनिल भोळे, शेखर भोपी, विवेक पाटील, अनिल कुरघोडे, गणपत वारगडा, विशाल सावंत, संतोष भगत, मयूर तांबडे, रवींद्र गायकवाड, राजेश डांगळे, प्रवीण मोहोकर, वचन गायकवाड, दीपक घोसाळकर, अरविंद पोतदार, शशिकांत कुंभार, संतोष सुतार, भरतकुमार कांबळे, सुभाष वाघपंजे, सुनील कटेकर, राकेश पितळे, हरेश साठे, लक्ष्मण ठाकूर, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कायदेशीर सल्लागार ऍड. मनोहर सचदेव आदी पत्रकारांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.