कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे
ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन येणार कुठून?? म्हणून मोतीराम भिका पादिर यांचा छोटासा प्रयत्न; कामावरून घरी आल्यानंतर स्वतःच्याच घरी घेतात गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास
कर्जत/ प्रतिनिधी :
कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असल्याने शासनाने राज्यातील सर्व विद्यालय व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षण घेण्याचे सुरुवात केली. माञ, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. आदिवासी समाजात अधिक गरीबी आणि गेल्या काही महिन्यापूर्वी लाॅकडाउन असल्याने दोन वेळेचे जेवण मिळणे अवघड झाले आहे. मग ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन येणार कुठून? परिणामी आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापसून वंचित राहिले आहेत.
परंतु, आदिवासी समाजातील नवी पिढी हिच आदिवासी समाजाची संपत्ती. त्यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे, आणि शिक्षणाची सातत्याने आवड निर्माण झालीच पाहिजे. या उद्देशाने लोभेवाडीतील मोतीराम भिका पादिर हे कामावरून घरी आल्यानंतर स्वतःच्याच घरी गावातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जवळ जवळ ४ महिन्यापासून संध्याकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत विनामूल्य घेत असतात. यावेळेत विद्यार्थी न चुकता दररोज अभ्यास करायला हजर राहतात.
या छोट्याशा प्रयत्नांनी आज लोभेवाडीतील मोतीराम भिका पादिर यांच्या पाठीवर आदिवासी समाजातून कौतुकाची थाप मारली जात आहे.