सायबर क्राईम रोखण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे गरजेचे : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह
पनवेल/ संजय कदम :
सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाईल, ईमेल, व्हॉटसअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे व आपले सर्व व्यवहार गोपनियतेने करणे गरजेचे असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केले आहे.
परिमंडळ 1 व परिमंडळ 2 हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात आता सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण फोनवरुन संपर्क साधून बँकेतून बोलतो आहे असे बोलून आपली माहिती काढत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मिडीया, मोबाईल, ईमेल, व्हॉटसअॅप, फेसबुक आदींच्या द्वारे हॅकींग करून माहिती घेतली जात आहे व आपल्या खात्यातील पैसे काढून घेतले जात आहेत. यामध्ये परराज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. तसेच नायजेरियन सुद्धा यात सक्रीय झाले आहेत. हे सर्व टाळण्याासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमधील माहिती इतरांना देण्याचे टाळावे, पैसे काढताना भरताना सुद्धा काळजी घ्यावी, एटीएममध्ये जाताना सतर्कता बाळगावी, बक्षिस लागले आहे, पेटीएम व वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी व्हा यासाठी तुमची माहिती पाठवा अशा प्रकारचे येणारे फोन टाळावेत व आपली माहिती त्यांना देवू नये असे आवाहन सुद्धा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केले आहे.