सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस उपायुक्त शिवराज पाटील
पनवेल/ संजय कदम :
सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी हजारो जणांची सेवा, शुश्रूषा व पालनपोषण केले आहे. या संस्थेला मदत समाजातील प्रत्येक घटकाने करावी असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी या आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना केले.
पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वांगणी गाव या ठिकाणी ‘सील आश्रम’ नामक सेवाभावी संस्था आहे. तेथे अनाथ, बेवारस व रस्त्यावर जखमी अवस्थेत मिळुन येणारे फिरस्ते इसम व अल्पवयीन मुलांची सेवा,शुश्रूषा व पालनपोषण केले जाते. सध्या तेथे एकूण 262 पिडीत व्यक्ती दाखल आहेत. सदर संस्थेत पोलीसांना मिळून आलेले बेवारस व्यक्तींनाही दाखल करीत असल्याने त्यांची पोलीस विभागास सातत्याने मदत होत असते.
नाताळ सणाचे औचित्य साधून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -2 चे शिवराज पाटील यांनी सदर संस्थेस भेट देऊन तेथील अनाथ व पिडीत व्यक्तींसाठी 300 किलो तांदूळ व 200 किलो तुरडाळ व उद्योजक कौशल डोंगरे यांचे करवी 100 किलो नैसर्गिक गुळ व मिठाई इत्यादीचे वाटप केले. सदर वेळी संस्थेचे असो. डायरेक्टर बिजु सॅम्युअल, प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती जैनम्मा व संस्थेत दाखल असलेले पीडित महिला,पुरुष, अल्पवयीन मुले व पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्यासह इतर अधिकारी वर्ग व अंमलदार उपस्थित होते.