Img 20201230 Wa0041
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच… सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल

पनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच

सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल

०१ टक्का फी वाचविण्यासाठी नागरिकांच्या झालेल्या गर्दीत दलाल मालामाल

अधिकाऱ्यांचेही हात दलालांच्या पाठीशी असल्याच्या नागरिकांच्या भावना

पनवेल/ राज भंडारी :
राज्यात उद्धव ठाकरे सरकारने महसुली खात्यात भर पडावी या उद्देशाने जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत बदल करून ०१ जानेवारीपासून ०३ टक्के असलेली स्टॅम्प ड्युटी ०४ टक्के करण्याचा आदेश परित केल्यानंतर सर्वच रजिस्टर कार्यालयांमध्ये नागरिकांची नोंदणी करण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला. यावेळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय ०१ चे जाधव, कार्यालय ०२ चे कदम, कार्यालय ०३ चे तेलतुंबडे आणि कार्यालय ०४ चे शैलेश गायकवाड यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता, येथील दलालांच्या घोळक्याने या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपात तक्रारदारांनाच घेराव घालून गुंडागर्दी करीत नंगानाच सुरू केला. यावेळी उपस्थित पत्रकार आपले काम करीत असताना खांदेश्र्वर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक दत्तात्रय शिवाजी शिंदे यांनी पत्रकारांनाच दमदाटी करून या दलालांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रकार केला आहे.
पनवेलमधील रजिस्टर कार्यालयांमध्ये दररोज लाखो – करोडो रुपयांचे व्यवहार रजिस्टर होत असतात. यामध्ये नागरिकांच्या कामांना अधिकारी वर्गाकडून दुय्यम स्थान दिले जाते, परिणामी आपले काम लवकर व्हावे यासाठी या नागरिकांना दलालांचा आधार घ्यावा लागतो, आणि याचा मोबदला या नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीत ढकलत आहेत. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांनीच हे दलाल नेमले आहेत का ? असा सवाल गोरगरीब नागरिक आता विचारत आहेत. राज्यात ०१ जानेवारीपासून रजिस्टर नोंदणी मुद्रंकामध्ये ०१ टक्क्यांनी वाढ होत असल्यामुळे रजिस्टर कार्यालयातील दलालांसह बिल्डर लॉबी मधील नागरिकांची गर्दी तुडुंब होत आहे. या आर्थिक गणिते जुळवून कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट होत आहे, मात्र आर्थिक गणिताची बिघाडी होवू नये म्हणून हे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र सध्या समोर उभे राहिले आहे.
नुकत्याच लंडनमध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने आपले रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे, तर दुसऱ्या बाजूला येथे येणारे दलाल हे तुंबळ गर्दी करून एका एका प्रकरणासाठी २० ते ३० जणांना एकत्र जमवित आहेत. पर्यायाने भारत देशासह राज्य सरकार या कोरोना रोगाला दूर ठेवण्याचे पर्याय अवलंबत असतानाच पनवेलमधील रजिस्टर कार्यालयामध्ये कोरोनासारख्या रोगाला पुन्हा उभारी देण्याचं काम येथील अधिकाऱ्यांच्या मदतीने हे दलाल करीत आहेत.
नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी विक्री व्यवहार होत आहेत. याठिकाणी इमारत बांधकाम व्यावसायिकही मोठ्या प्रमाणावर आपले प्रकल्प उभारत आहेत, मात्र मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या बांधकामामध्ये मुंबईसह उपनगरातील नागरिक याठिकाणी आपली स्वप्नातील घरे घेत आहेत. कर्जबाजारी होवून मध्यमवर्गीय नागरिक स्वप्नातील घरे उभारत आहेत, मात्र ज्या रजिस्ट्रेशनला जितके पैसे लागणार आहेत तेवढे पैसे देवून स्वतः पक्षकार आपले रजिस्ट्रेशन करू शकतो. मात्र येथील अधिकारी हे दलालांच्या आणि स्वतःच्या भल्यासाठी असे होवू देत नाहीत, तर नागरिकांना वारंवार खेटा मारण्यास प्रभावित करतात.
नवीन पनवेल येथील एमटीएनएल बिल्डिंगमध्ये असणाऱ्या रजिस्टर कार्यालयामध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला जात असल्याच्या तक्रारीनंतर तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार पत्रकारांनी हस्तक्षेप करून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडू नये म्हणून प्रयत्न केला, यावेळी पत्रकारांनी पालिकेचे प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड यांना पाचारण केले. यावेळी गायकवाड यांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र दलालांच्या नेहमीच्या गुंडशाहीने त्यांना धुडकावून लावले. शेवटी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आल्यानंतर आता आपले नुकसान होणार या भीतीने येथील दलालांची झुंड पत्रकारांजवळ आरेरावी करून रजिस्टर कार्यालयातच धिंगाणा घालून एक प्रकारे नंगानाच करीत असल्यासारखी वागू लागली. सदर प्रकार सुरू असताना पोलीस ठाण्याचे कर्मचारी मात्र त्यांना आवर न घालता पत्रकारांशी हुज्जत घालतानाच समोर आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे वाली कोण ? असा सवाल आता जनसामान्यांना पडला आहे. येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय ०१ चे जाधव, कार्यालय ०२ चे कदम, कार्यालय ०३ चे तेलतुंबडे आणि कार्यालय ०४ चे शैलेश गायकवाड यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांना आता कोण वाचविणारा ? असा सवाल आता नागरिकांना पुन्हा पुन्हा सतावीत आहे.