पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य
उरण/ प्रतिनिधी :
उरण शहरातील उरण नगर परिषदेच्या मुख्य गेट जवळ असलेले व एन आय हायस्कुल शाळेसमोर असलेले बापूशेठ वाडी येथील गार्डन व्हू सोसायटीच्या पाणी पिण्याच्या विहिरीमध्ये परिसरातील काही व्यक्ती आपल्या घरातील कचरा, अन्न पदार्थ टाकत असल्याने या विहिरीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
कचऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होत आहे. सदर विहिरीत नागरिक कचरा टाकत असल्याने पाण्याला दुर्गंधी येण्याची व पिण्याचे पाणी खराब होण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात केंद्र व राज्य शासन हे स्वछता विषयक जनजागृती करत आहेत तरी अजूनही काही व्यक्तींच्या विचारात, व्यक्तींच्या मानसिकतेत बदल होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. सदर विहिरीत कोणी घरातील अन्न पदार्थ, घरातील कचरा एखादी व्यक्ती टाकत असेल किंवा असे कृत्य करताना आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांनी दिली आहे.