महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश
—————
विजेचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल महावितरण संपूर्ण सहकार्य करेल. आणि सर्वांनी अधिकृतपणे वीज वापरावी.
-सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण- पनवेल
————–
नवीन पनवेल/ प्रतिनिधी : तोंडरे गावात रायगड ज़िल्हा परिषद शाळेमध्ये महावितरण आपल्या दारी हा शिबीर राबविण्यात आला. या शिबिरामध्ये नवीन वीज मीटर जोडणे, खराब व जळालेला मिटर बदलून देणे, तसेच नागरिकांना विजेच्या येणाऱ्या समस्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या नवीन वीज मीटर, खराब व जळालेले मीटर बदलून देणे तसेच वीजेसंदर्भात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी महावितरणकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले व महावितरणने महावितरण आपल्या दारी हा कार्यक्रम तोंडरे गावातील शाळेत घेतला. या शिबिरास माजी नगरसेविका उज्वला पाटील, माजी नगरसेवक विष्णू जोशी, महावितरणचे कार्यकारी अभियंता सतिश सरोदे, देविदास बैकर-अतिरिक्त कार्यकारी अभियंता पनवेल, निलेश बुकटे-सहाय्यक अभियंता नावडे शाखा, तोंडरे गावचे माजी सरपंच वासुदेव पाटील, अशोक पाटील, राम पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, शाळेय व्यवस्थापक कमिटी अध्यक्ष-दिलीप पाटील, शेकाप युवा कार्यकर्ते गोमेश पाटील, प्रल्हाद पाटील, योगेश पाटील, अशोक पाटील, गुरुनाथ पाटील, अमित पाटील, अरुण पाटील, जितेश पाटील तसेच शिवसेनेचे जिवन पाटील- युवा सेना विभाग अध्यक्ष, महिंद्र पाटील-तोंडरे शाखा अध्यक्ष यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
—————-
तोंडरे परिसरात नागरिकांना महावितरण संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या संदर्भात महावितरणला निवेदन देऊन एक दिवसीय शिबिर घेण्यासाठी सांगण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला व नवीन मीटर कनेक्शन घेण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले.- उज्वला विजय पाटील, माजी नगरसेविका