नेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..
पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात विकास होतांना दिसत आहे. नेरे विभागात विकासकांनी जमिनी विकत घेवून मोठया प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या खूप मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तसेच या विभागात गाडेश्वर शिवमंदिर, देहरंग धरण, चांदेरी डोंगर, (पेब) विकडगड, व माची प्रबळगड, माथेरान अशी पर्यटन स्थळे व सिने अभिनेत्यांचे फार्म हाऊस असल्यामुळे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. काही महिन्यांपूर्वी मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीमध्ये खुनाचे प्रकार घडले. गुरे चोरी, लहान मुलांचे अपहरण, महिलांवरील अत्याचार, वाहनांचे अपघात असे अनेक प्रकार घडत आहेत.
नेरे – दुदरे विभागातील चिपळे, नेरे, वाजे मालडुंगे, दुंदरे, उमरोली, व मोरबे, खानाव, हरिग्राम केवाळे व वांगणी तर्फे वाजे या ग्रामपंचायती आहेत. गुन्हयांचे प्रकार लक्षात घेता गटविकास अधिकारी यांनी वरील ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील प्रत्येक गावाच्या प्रवेशव्दारावर किंवा मुख्य चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यास सुचना कराव्यात. अशी मागणी पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव दिनेश मांडवकर, उप तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, नेरे विभाग अध्यक्ष विद्याधर चोरघे यांनी केली आहे. जर प्रमुख ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले तर पोलिस वर्गांना देखील चोरी, खुन अपघात अपहरण अत्याचार इत्यादी गुन्हयांची उकल करण्यास मदत होईल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.