पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र
–
कर्मचारी पनवेल महानगर पालिकेचे..?
सदर कर्मचारी महानगरपालीकेचे असल्याची माहिती मिळत आहे. महानगर पालिकेने डेटा एंट्री ऑपरेटर दिले आहेत. या कामासाठी महापालिकेचा स्टाफ म्हणून हे युवा कर्मचारी दिल्याचे समजते आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे महानगर पालिकेने असे महान कामगार कसे उपलब्ध करून दिले ते देखील कळले नाही.स्मार्टसिटी म्हणून पनवेल महानगर खऱ्या अर्थाने केव्हा लौकिक मिळेल? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पण अशा अतीस्मार्ट कर्मचारी वर्गामुळे पनवेलचा लौकीक नक्कीच धुळीस मिळेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी मांडली आहे.
बंद दाराआड काय…?
तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज आपल्या कामासाठी लोकं पनवेल तहसील कचेरीत येत असतात. बंद दार ठोठावण्याची त्यांची इच्छा असते. पण कधीच हिम्मत होत नाही. या बंद दाराआड काय होत असावे? हा प्रश्न पण अनेकदा सगळ्यांना पडत असेल. सध्याच्या या घटनेमुळे बंद दाराआड चाललंय काय? याचे उत्तर काही अंशी दाखला म्हणून या घटनेतुन मिळाले असणार.
——————–
पनवेल /आदिवासी सम्राट :
सोशल मीडिया आता सगळ्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनलं आहे.तुजा माझ्यावर भरोसा नाय का…? खुप गाजलं होतं. कोरोना काळात शाळा, शिक्षण, उद्योग, व्यवसाय सगळं ऑनलाईन होतंच की, पण अनेकदा या सगळ्याचे गैरवापर होतात. सध्या पनवेल तहसील कार्यालय अशा “सोशल” वापराने आधुनिक तमाशा केंद्र बनले आहे.
पनवेल तहसील कार्यालय इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर निवडणूक कार्यालय आहे. या ठिकाणी हे तमाशा केंद्र सुरु असल्याचे वायरल पोस्ट आणी बातम्या मधून सगळीकडे अक्षरशः गाजत आहे. सरकारी कार्यालय जनसामान्य लोकांसाठी जीवनावश्यक असतात. त्यामुळे सगळी कामे जबाबदारीची असतात.पण अशा ठिकाणी सोशल मीडिया प्रेमी जर त्यांचे तमाशे सुरु करतील तर शासकीय कार्यालये आधुनिक तमाशा केंद्र नक्कीच बनतील.अगदी तेच झाल्याने आता पनवेल तहसील कार्यालय आधुनिक तमाशा केंद्र बनले असल्याची जनतेची धारणा बनली आहे.
निवडणूक शाखेमध्ये डेटा एन्ट्रीचे काम एका खोलीत होते. त्यामध्ये काही तरुण तरुणी कामे करत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरु असलेली त्यांची “थेरं” ऑनलाईन सगळीकडे पसरली. हि “सोशल थेरं ” रिल्स बनून वायरल झाली. काही युट्युब मधून त्यांना बातमी स्वरूपात प्रकर्षाने सामाजिक दुबुद्धी म्हणून प्रसिद्धी मिळाली. पण याचे त्या संबंधीत तरुणाला काहीही चुकलंय असे वाटत नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबतीत काही खुलासावजा बाजू मांडावी म्हणून त्याला भेटल्या नंतर देखील त्याला काहीतरी चुकीचं वागल्याचं नाही, तर ग्रेट केल्याचे फिलिंग त्याच्या देहबोली मधून व्यक्त होत होते.
पनवेल महानगर आणि तालुक्यात याची खमंग चर्चा सुरु आहे. त्यामुळे तहसील कार्यालय प्रमुख म्हणून याबाबतीत तहसीलदार विजय पाटील यांची प्रतिक्रिया घ्यावी म्हणून भेट दिली असता. त्यांच्या दालनामध्य खुप सारे लोकं होते. पण तहसीलदार नव्हते त्यामुळे याबद्दल त्यांना काय वाटते हे समजू शकले नाही.
प्रत्येक जुनी पिढी नव्या पिढीच्या आधुनिक वागण्याला नावं ठेवते. फेसबुक,रिल्स, सोशल मीडिया याचा वापर आता सर्रास होतो. अनेकवेळा शासकीय युनिफॉर्मसह किंवा कामाच्या वेळेत अशा सोशल प्लॅटफॉर्मचा वापर केला म्हणून कर्मचारी बडतर्फ झाल्याचे प्रकार घडले आहेत. सध्या असलेले हे सोशलवीर काही राजकीय मार्गाने या शासकीय कामाला लागल्याचे कळते आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कार्यालय राजकीय अड्डा वाटला असावा. राजकारणात सध्या सगळं क्षम्य मानलं जातं. त्यामुळे त्यांना याचं काहीच वाटत नसलं तरी जनसामान्य आणी प्रशासकीय क्षेत्रात या प्रकरणाने तहसील कार्यालयाची नाचक्की निश्चित झाली आहे. आता यावर कोणती कारवाई होते की हा नवा प्रशासकीय सोशल बदल ठरतोय हे येणाऱ्या काळात कळणार आहे. घटनेची उलटसुलट चर्चा मात्र प्रचंड मोठी होत आहे.