जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा
रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आयोजन
जव्हार/प्रतिनिधी :
संपूर्ण जगभरात ८ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी उल्हासात महिला दिन साजरा होत असताना मात्र पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे अनोख्या सामाजिक उपक्रमांतून महिला दिन साजरा करण्यात आला.रविवार दिनांक ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने तज्ज्ञ महिला डॉक्टरांनी सुमारे २०० आदिवासी मुलींना मासिक पाळी आणि स्त्रियांच्या आजाराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुलींना दुर्गम विभागातील महिलांनी बनविलेले सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर )यांच्या पुढाकाराने येथील दोन वस्तीगृहांना सॅनिटरी नॅपकिन वापरानंतंर दहन करून विघटन करणारी मशिन्स भेट देण्यात आली.
रेसोनिया (पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने आणि नवजीवन फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या सोहळयाला जव्हार पंचायत समितीच्या मा सभापती तथा भाजपा च्या पालघर जिल्हा अध्यक्षा ज्योती हरिश्चंद्र भोये उपस्थित होत्या. तर सुप्रसिद्ध महिला रोग तज्ज्ञ डॉ. अनिता पाटील यांनी मुलींना अत्यंत सोप्या शब्दात आणि लाघवी पद्धतीने मार्गदर्शन केले.वसतीगृहाच्या वॉर्डन पुष्पा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत जुने जव्हार आणि नवीन जव्हार येथे आदिवासी मुलींची दोन वसतिगृहे आहेत. दोन्ही वसतिगृहातील सुमारे २०० मुलींना या उपक्रमाचा लाभ झाला. नवजीवन फाउंडेशनचे वैभव घोलप यांनी देखील उपस्थित मुलींशी संवाद साधत त्यांची सेवाभावी संस्था करत असलेल्या कामाबाबत साऱ्यांना अवगत केले.
रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने एका अत्यंत निकड असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबद्दल सर्वत्र त्यांच्याबद्दल कृतज्ञेतेची भावना व्यक्त केली जात होती. कार्यक्रमाचे अंती मुलींच्या हस्ते केक कापण्यात आला. अल्पोपहार झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.या वसतिगृहात दुर्गम ग्रामीण विभागातील मुली राहात असतात. उमलत्या वयात त्यांच्या मनात असंख्य शंका कुशंका उठत असतात. अशा प्रकारच्या थेट संवाद कार्यक्रमातून आदिवासी समाजातील मुलींच्या लैंगिक शिक्षणात मोलाची भर पडणार आहे.लैंगिक आजाराबाबत मुलींच्या मनात असणारे गैरसमज,अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉ अनिता पाटील यांनी सोप्या शब्दात अगदी मोकळा ढाकळा संवाद साधला. तसेच उपस्थित मुलींना आहार,सवयी आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या सी एस आर फंडातुन यावेळी दोन्ही वसतिगृहांना वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन चे दहन करून विघटन करणारी मशिन्स भेट देण्यात आली.सदर मशिन्स चे वापराने निर्जंतुकीकरण स्तर उंचावला जाईल. अशा प्रकारे थेट संपर्क साधत सामाजिक उपक्रम राबविण्याची हि पहिलीच घटना असावी. रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर) यांच्या पुढाकाराबद्दल ज्योती भोये यांनी त्यांचे आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला जव्हार पंचायत समितीच्या मा सभापती तथा भाजपा च्या पालघर जिल्हा अध्यक्षा ज्योती भोये, सुप्रसिद्ध महिला रोग तज्ज्ञ डॉ अनिता पाटील,नवीन जव्हार वस्ती गृहाच्या वॉर्डन पुष्पा जाधव,जुने जव्हार येथील वसतिगृहाच्या लिपिक उर्मिला वाघ तसेच टीम रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाइट पॉवर ) यांची प्रमुख उपस्थिती होती.