आदिवासी कलाकार करतोय “कोरोना” विषयी जनजागृती
——————————-
“या उपक्रमामुळे स्वतःची कला जोपासण्यासोबतच, पाड्यावरील आजूबाजूच्या घरातील लहान मुलांचा वेळ वारली चित्रकला शिकवण्यात जातो. तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी घरातील आपल्या कुटुंबियांना ही मुले घरी गेल्यावर स्वतःहून माहिती देत असून त्याविषयी जनजागृती करत असल्याचे” विजय वाडू ह्यांने सांगितले.
——————————
डहाणू/ मनोज बुंधे :
ग्रामीण भागातील पालघर जिल्ह्यात राहणार्या विजय वाडू या आदिवासी कलाकार हा आपल्या वारली कलेचा सराव करण्याबरोबरच एका वेळेला आपल्या पाड्यातील चार आदिवासी मुलांना संपूर्ण सुरक्षेसह वारली कलेचे धडे देतोय. वारली कला शिकवतानाच कोरोनापासून काळजी घेण्यासाठी तो जागृती करत आहे.
तसेच विजय वाडू यांना महाराष्ट्र शासनाचा “आदिवासी रत्न कलाकार” हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. याचबरोबर विदेशात त्याच्या वारली चित्रांची प्रदर्शने ही भरली आहेत.
विजयच्या या उपक्रमाविषयी जाणून घेऊयात…
>>> आंबेसरी फादरपाडा ता. डहाणू येथे राहणारा विजय बाबू वाडू हा वारली चित्रकलेत पारंगत असणारा आदिवासी तरुण. लॉकडाऊनमुळे बाहेर जाणे बंद झाल्याने दिवसभराच्या मोकळ्या वेळेचा स्तुत्य उपक्रम करण्याचे त्याने ठरवले, तसेच जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य रोगाविषयी आपल्या आदिवासी पाड्यावर जागृती नसल्याचे त्याला दिसून आले. या जाणिवेतून त्याने शक्कल लढवून एक उपक्रम हाती घेतला. विजय हा आपल्या घराच्या व्हरांड्यात एका वेळेला पाडयावरील तीन ते चार लहान मुला मुलींना घेऊन वारलीचित्रकला शिकवत आहे. मात्र हा उपक्रम राबवताना विजय ने मास्क वापरणे, स्वच्छता राखणे सुरक्षित अंतर ठेवणे, अधिक गर्दी टाळणे याची पुरेपूर काळजी घेतली आहे. कोरोना म्हणजे काय, त्याची लक्षणे, स्वच्छता कशी राखावी, आपले नाक आणि तोंड रुमाल व मास्कचा साहाय्याने कसे झाकावे यासारख्या शासनाने सांगितलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती विजय या लहान मुलांना चित्रकला शिकवताना देत आहे.