Img 20210515 Wa0028
ताज्या नवी मुंबई रायगड सामाजिक

“ताऊक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

“ताऊक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

अलिबाग/ जिमाका :
रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर दि.16 व 17 मे 2021 या कालावधीमध्ये चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग खूप जास्त असण्याचा तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष निधी चौधरी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्य सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.
त्याचबरोबर कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासन देत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
1. मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये. 2. मच्छिमारांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. 3. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये. 4. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे. 5.घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे. 6. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. 7. आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदील), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात. 8.वादळाच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुका मेवा/खादयपदार्थ जवळ ठेवावेत. 9.चक्रीवादळाबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा, रेडिओसाठी काही जास्त सेल/बॅटरी जवळ ठेवाव्यात. 10. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे. पिण्याचे पाणी शुध्दीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे. 11. अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. 12. ग्रामकृतीदलाच्या सूचनेनुसार व जिल्हा / स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात. 13.सद्य:स्थितीत जिल्हयात गृहविलगीकरणात असलेले नागरीक धोकादायक घरात राहत असल्यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी पाठवताना त्यांचा इतर व्यक्तींशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी. 14. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे. 15. मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसिलदार कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02141-222097/227452 वर संपर्क साधावा किंवा 8275152363 नंबर वर व्हॉट्सॲप करावे.