ppp
खारघर ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे!

सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

पनवेल/ प्रतिनिधी :
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे आज (शुक्रवार, दि. १४ मे ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. 
गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  त्या संबंधी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, स्थानिक प्रकल्पग्रस्त, व  नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची जोरदार मागणी केली आहे. त्या संदर्भात पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस महेंद्र घरत, भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, दशरथ भगत, संतोष केणी,के. के. म्हात्रे, निलेश पाटील, नंदराज मुंगाजी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी, नवी मुंबईला विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी समितीच्या माध्यमातून जोरदार मागणी केली. तसेच वेळ पडल्यास आंदोलने करण्याचा निर्धार त्यांनी अधोरेखित केला.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले कि, या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. असे असताना अचानकपणे १७ एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले कि, २ जानेवारी २०१५ रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालिन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री  अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १९ जून २०१८ रोजी पाठविला. फडणवीस साहेब यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे ७ जुलै २०१८ रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते. तसेच अनेक स्थानिक आगरी-कोळी आणि दहा गाव संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणीही केली होती. पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कृती केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सिडकोविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आले नसताना आणि कोरोनाचा बिकट काळ सिडकोच्या ‘एमडी’ नी धिसाडघाईने प्रस्ताव सादर केला. एमडी च्या भूमिकेचा जाहीर निषेधही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  ते म्हणाले की, दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भुमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचले आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमिन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते, अशी माहिती दशरथ पाटील यांनी पत्रकारांना दिली.
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौमत संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमाप्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरहिरीने भाग घेवून तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तीदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागृत राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी समितीतर्फे दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल येथील जनतेच्या मनात नितांत आदर असून, त्यांचे वैक्तिमत्वही उत्तुंग आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्पांना देता येईल. मुंबईत त्यांचे शिवाजी पार्क येथे करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपुजन अलिकडेच मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे. दिबासाहेब शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजविणारे व्यक्तिमत्व होते. ते येथील जनतेसाठी लढले त्यांचे घरही लोकवर्गणीतून बांधण्यात आले आहे.  नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी व महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांचे जे योगदान आहे त्याला तोड नाही. म्हणून येथील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अन्यथा आंदोलन उभारणार असल्याचा पवित्रा त्यांनी जाहीर केला. व त्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न व पाठपुरावा समिती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + = 6