Img 20210926 Wa0004
आरोग्य कर्जत ताज्या नेरळ रायगड सामाजिक

आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?

आदिवासींची उपेक्षा कायम !

वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?

रस्त्या अभावी आदिवासींचे हाल, रुग्णाला द्यावा लागतो झोळीचा आधार

कर्जत/ नितीन पारधी :
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार केला होता मात्र हा रस्ता व साकव या वर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. तर एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी त्याला झोळी करत नेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील या रस्त्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने आदिवासींची हि उपेक्षा संपणार काही असा जळजळीत प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.
माथेरानच्या डोंगरात अनेक ठिकाणी आदिवासी बांधव राहतात. याठिकाणी जुमापट्टी धनगरवाडा ते बेकरेवाडी, नाण्याचा माळ, मान्यच माळ, अशा आसलवाडी पर्यंत सुमारे ११ आदिवासी वाड्या आहेत. मात्र दळणवळण म्हणून या वाडयांना रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे येथील आदिवासी बांधवानी शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून येथील रस्ता तयार केलेला होता. रस्त्याला वनविभागाचा अडसर असल्याने दरवर्षी येथील रस्ता येथील लोक कच्च्या स्वरूपाचा श्रमदानातून रस्ता बनवत असतात. मात्र यंदा २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील रस्ता पुरता वाहून गेला आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांचा संपर्क तुटला आहे. येथील बहुतांश आदिवासी बांधव हे नेरळ, माथेरान येथे कामाला आहेत. त्यामुळे हा रस्ता त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. मात्र रस्ता वाहून गेल्याने त्यांची आता परवड होत आहे. तर याकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील आदिवासी करत आहेत.

रस्ता नसल्याने येथील आदिवासी वाडीतील एखादा व्यक्ति आजारी पडल्यास हा रूग्ण व गरोदर स्त्रिया यांना रुग्णालयात नेताना बांबूंची डोली करून रात्री अपरात्री ५ ते ६ किलोमीटर अंतरावर जूम्मापट्टी या ठिकाणी आणून नेरळ किंवा कर्जत या शहरा ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते. तेव्हा हा रस्ता लवकर करून देण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी लेखी पत्रव्यवहार करत साकडे घातले होते. तर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना देखील प्रत्यक्ष भेटत जैतू पारधी, गणेश पारधी यांनी आपली व्यथा देखील मांडली होती. तसेच रस्ता न झाल्यास येथील आदिवासी बांधव भारताच्या स्वतंत्रदिनी जूम्मापट्टी येथे रस्ता रोखो आंदोलन करणार होते. मात्र पालकमंत्री अदिती तटकरे यांनी उपोषण करू नका रस्ता होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप हा रस्ता न झाल्याने येथील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत. आमचा रस्ता झाला नाही तर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा आदिवासी सेवा संघ कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी यांनी दिला आहे. दरम्यान शासन व लोकप्रतिनिधी हे आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहणार कि रस्त्याच्या कामाला सुरवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.