प्रभुदास भोईर ऊर्फ अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध शासकीय दाखले वाटप शिबीरांचे आयोजन
प्रभुदास भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शासकीय अधिका-यांनासह राजकीय नेत्यांनी लावली हजेरी
पनवेल/ प्रतिनिधी :
प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खिडूकपाडा परिसरातील नागरिकांसाठी विनामूल्य दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच कोरोना कालखंडात जीवाची बाजी लावून अत्यावश्यक सेवेसाठी स्वतःला झोकून देऊन कार्य करणाऱ्या प्रभुतींचा संघर्ष योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या शुभहस्ते दाखले वाटप शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. कोरोना कालखंडात आख्खे जग थांबले होते. परंतु तरी देखील अत्यावश्यक सेवेत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जनसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा श्रीदत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत ९५ कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला.
याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रभुदास भोईर म्हणाले की, नुकताच दहावी आणि बारावी चा निकाल लागला आहे. महाविद्यालयीन प्रवेशाच्या प्रक्रिया करता विविध दाखल्याची आवश्यकता भासते. अशावेळी मुलांचे पालक वणवण करत असतात. योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याकारणाने त्यांची होलपट होते. म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही आज विनामूल्य दाखले वाटप शिबीर आयोजित केले आहे.
यावेळी बबन दादा पाटील यांच्या समवेत आमदार नरेंद्र पवार, अनिल पाटील, म्हाडाचे कोकण विभागीय माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोहन मुळीक, तहसीलदार पनवेल विजय तळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, नवीन पनवेल गुरुद्वारा प्रबंधक कमिटी प्रधान बलविंदर सिंग, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, नगरसेवक सतीश पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोईर, विजय भोईर,विजय पाटील, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, डॉक्टर रुपेश वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.