Img 20191121 Wa0004
ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात ; मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात

मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव


मोखाडा/ प्रतिनिधी :
एकीकडे जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्या देशात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण उल्हासनगर येथील एका मालकाने चक्क वेठबिगार म्हणून बंधक बनवलेले, कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या 13 वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची या गावात झालेली अचानक भेट हा गंभीर प्रकार उघड होण्यास कारण ठरली. नंतर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठबिगारीच्या पाशातून मुक्त केले, याबाबत या अन्यायग्रस्त कुटुंबाने मुक्त होताच मोखाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे.
मोहन भीका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन याचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी या ठिकाणी राहतात, पूर्वी ते भिवंडीतील पडघ्याला वीटभट्टीवर कामासाठी जायचे. मागील गणपतीच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले हा मालक आपल्या वडिलांसोबत वाडीत आला, त्याच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या काही लोकांनी मोहनचे कुटुंब आणि योगेश वायले याची भेट करून दिली, शेठ चांगला आहे या समजुतीने मोहनचे कुटूंब कामावर जायला तयार झाले, त्यावेळेस योगेश याने 3000 (तीन हजार रुपये) रोख बयाना दिला. त्यानंतर पुन्हा गणपती गेल्यावर काही दिवसांनी येऊन 10000(दहा हजार रुपये) इतकी रक्कम देऊन मी घटस्थापनेनंतर घ्यायला येईन असे सांगून गेला. नंतर ठरलेल्या दिवशी येऊन योगेश याने मोहन, त्याचे आई-वडील, गौरी (वय 7 वर्षे) , बायडी (वय 9 वर्ष) आणि शैली (वय 13 वर्षे ) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब योगेशने उल्हासनगर 5 नंबर येथे नेले. तिथे वीटभट्टी जवळ एका खोलीत याना ठेवले, विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला – उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे करून घेतली. सुट्या मजुराला ( रोजंदारीच्या) 400 रुपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ 200 व महिलेला 100 मजुरी दडून शोषण करत होता. स्वतःकडे काम नसले की बाहेर कामला पाठवून तिकडून येणाऱ्या मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.
दिवाळी मध्ये या लोकांनी घरी जायचे सांगितले तर मालकाने विरोध केला, मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवले व हे कुटुंब परत यावे म्हणून शैला ताब्यात ठेवतो असे सांगत एक रुपया दिला नाही, जवळ वाचलेले 1000 रुपये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी पार अंधारात गेली. घरी शासकीय योजनेतून घरकुल आलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. गावातील कुणाकडून तरी वडिलांनी 500 रुपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि तीन बहिणींसोबत त्यांना पुन्हा उल्हासनगर येथे धाडले कारण आपली छोटी मुलगी तिकडेच मालकाने अडकून ठेवलेली.
परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाने कच्या विटा एकावर एक रचून झोपडे बनवून राहायची व्यवस्था केली. त्यानंतर योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्या कडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागे, बाहेर मिळालेल्या 300 मजुरीतून 100 रुपये द्यायचा कधी ते ही देत नसे, राजू हा गौरीला मारहाण करायचा शिवीगाळ करायचा. काम झाल्यावर मजुरांना पाय धरायला लावायचा, मोहन ची आई आणि बहिणीनाही अनेकदा पाय धरायला लावायचा मग हजेरी लिहायचा. त्रास वाढत चाललेला,पळून जावे वाटायचे मात्र शेठ मारून टाकले या भीतीने निमूट काम करत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. याबाबत मोहन ने वडील भिका दिवे यांना याबाबत फोन करून सांगितलेले, गौरीच्या मारहाणीबाबतही सांगितलेले. शेवटी गावातील गावात त्याने याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. मोखाड्यातुन पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह राजेश चन्ने, वासू वाघे इत्यादी कल्याण अंबरनाथ मधील कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांची मदत घेत या पूर्ण कुटुंबाला त्यांच्या बिऱ्हाडासह मुक्त केले.
आज याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात मोहन भिका दिवे याने याबाबत फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.
निवडणुकीदरम्यान विवेक पंडित यांचे या गावात जाणे झालेले, त्यावेळी येथील बेरोजगारीची भयाण परिस्थिती पाहून पंडित यांनी स्वतः लक्ष घालत यागावात रोजगार हमीतून रोजगार निर्मिती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले, प्रशासनाची मदत घेत येथील स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करून यशही मिळवले, त्यानंतर कार्यकर्ते यागावत वस्तीच्या बैठकही घेऊ लागले त्यातून अनेक प्रश्न समोर आले, पंडित यांची एक विद्यार्थिनी ममता परेड या आदिवासी समाजातील उदयोन्मुख लेखिकेने या वाडीवर एक लेख लिहिला आणि त्यातून हा वेठबिगारीचा मुद्दा समोर आला. पुढे ही सगळी सूत्र हलली आणि दिवे कुटुंबाने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला, मागील आठवड्यात श्रमजीवी संघटनेच्या सीता घाटाल,कमलाकर भोरे,संतोष धिंडा, अजित गायकवाड, गोविंद गावित यांनी याच वाडीतील एक कुटुंब शहापूर येथील श्रमजीवीचे प्रकाश खोडका यांच्या मदतीने याच वाडीतील एक कुटुंब मुक्त केले होते.
श्रमजीवी संघटनेचा जन्मच मुळात वेठबिगार मुक्तीच्या लढ्याने झाला, विवेक आणि विद्युलता पंडित या दाम्पत्याने गुलामगिरी विरोधी दिलेल्या उल्लेखनीय लढ्यानंतर या भागातील वेठबिगारी समस्या समूळ नष्ट झालेली. त्यानंतर या दाम्पत्याला गुलामगिरी विरोधी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अँटी स्लेव्हरी पुरस्कार देखील मिळाला आहे. पुन्हा दारिद्र्य आणि भुकेच्या भीषण परिस्थितीमध्ये रोजगाराच्या अभावाने, रोजगार हमीच्या अंमलबजावणीतील आणि धोरणातील त्रुटीमुळे आदिवासी पुन्हा या वेठबिगातिच्या विखारी पाशात अडकत असल्याचे समोर आल्याने पंडित यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मोहन भिका दिवे (वय 20 वर्षे) याच्या फिर्यादीवरून मोखाडा पोलीस ठाण्यात योगेश वायले, राजू वायले आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात अनअनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 3(1)6, बालमजूरी कलम 18(1)अ, भादवीसं 342,504,506 अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.