महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापार्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल/ संजय कदम :
लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने काही दिवसापासून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना तसेच व्यापार्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला बाजारपेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
बाजारपेठेत एकाच वेळी सर्व दुकाने उघडल्यास खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होवू शकते. त्या अनुषंगाने सम-विषम प्रमाणात दिवसाआड दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क प्रत्येकाने घालावा, सॅनिटायझरचा वापर करावा, दुकानात गर्दी करू नये अशासह अनेक सूचना आयुक्तांनी व्यापारी वर्गांसह नागरिकांना केल्या आहेत. या सुचनांचे पालन पनवेल बाजारपेठेतील दुकानांमध्ये होताना दिसत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेबरोबरच मोबाईल दुरुस्ती दुकाने, रेडीमेंड कपड्याची दुकाने, संगणक, लॅपटॉप दुरुस्ती, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, शालेय पुस्तकांची दुकाने, सोन्या-चांदीच्या व्यापार्यांची दुकाने सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास बाजारपेठेत येत असल्याने वाहनांची वर्दळ बाजारपेठेत चांगली दिसून येत आहे. असे असले तरी खरेदी करण्यासाठी जाणारे ग्राहक हे शासनाने आखून दिलेले नियम पाळूनच खरेदी करत असल्याचे सुद्धा चित्र दिसत आहे.