Img 20200705 Wa0025
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई सामाजिक

सिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी 

सिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी 



सिडकोचे बिल्डरधार्जिन नियोजन
स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
—————————-

पनवेल/ संजय कदम :
सिडको विकसित करीत असलेल्या खारघर परिसरातील सोसायट्यांमध्ये सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी तुंबणे व सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले असून सिडकोने गरिबांसाठी उभारलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प स्वप्नपूर्तीला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे. सिडकोच्या ढिसाळ आणि बिल्डरधार्जिन नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे. विशेष म्हणजे पाणी साठल्याची तक्रार एक दिवस आधी करून सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे गेले दोन रात्र स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत.
खारघर सेक्टर-36 येथे सिडको निर्मित स्वप्नपूर्ती सोसायटीत मागील दोन वर्षांपासून पाणी साठण्याचा प्रकार घडत आहे. सिडकोने स्वप्नपूर्ती सोसायटी तयार करताना आजूबाजूच्या बिल्डरांना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत नियोजन करण्याचे व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे या बांधकामांवर पडणारे पावसाचे पाणी सोसायटी पाठीमागील शेततातील खोलगट भागात गोळा होतो. या ठिकाणी स्वप्नपूर्ती सोसायटीची संरक्षण भिंत आहे. खोलगट भागात साठलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास वाट नसल्यामुळे साठलेल्या पाण्यात प्रचंड दबाव निर्माण होऊन पाणी थेट संरक्षण भिंतीच्या निकृष्ट बांधकामाच्या खालून सोसायटीत घुसत आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोसायटीतील एल 30 क्रमाकांच्या इमारतीपासून अर्ध्या सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे. अक्षरशः एखाद्या नदीतुन वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे इमारतींखाली साठलेले पाणी प्रवेशद्वाराच्या दिशेने वेगात वाहत आहे. पावसाच्या संतत धारेमुळे पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. हळू-हळू साठलेल्या पाण्याचे सोसायटीच्या आतील इमारती वेढल्या गेल्या. तोपर्यंत इमारतींखाली उभी केलेल्या वाहनांची चाके पाण्यात बुडाली होती. इमारतींच्या वरच्या मजल्यांमध्ये राहणारे रहिवाशी पावसाचा हा खेळ खिडकीतून उघड्या डोळ्यांनी पाहत होते. रात्री 12 नंतर संपूर्ण सोसायटीला नदीचे रूप आले होते. सोसायटीतील काही सतर्क रहिवाशांनी एक दिवस आधीच सिडकोच्या अभियंत्यासोबत संपर्क करून परिस्थिती कानावर घातली. मात्र अभियंत्यांनी नेहमी प्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे रात्री स्वप्नपूर्ती सोसायटीला तळ्याचे रूप प्राप्त झाले. सोसायटी आलेल्या पाण्यामुळे साप सुद्धा फिरताना काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे साठलेल्या पाण्यामुळे अधिकच धोका वाढला आहे. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना या परिस्थितीबाबत अवगत असता याबाबत तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती चंद्र यांनी दिली.