20200714 140109
ताज्या पुणे महाराष्ट्र सामाजिक

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

पुणे/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग सदैव कार्यरत आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार न करता, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येतात. असाच एक उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत येणाऱ्या आदिवासी मुलींचे वसतिगृह जुन्नर, राजगुरूनगर, डेहणे, मंचर, घोडेगाव यांच्या गृहपालांकडून आयोजित करण्यात आला आहे. प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार राज्य सेवा परिक्षेत यश मिळवणारी आदिवासी समाजातील विद्यार्थिनी पूजा शिवाजी भोईर हि उद्या, मंगळवारी सायंकाळी चार वाजता गुगल मिटद्वारे मार्गदर्शन करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा इथल्या भोईरवाडीची पूजा शिवाजी भोईर (२६) हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परिक्षेत ४२६ गुण मिळवले असून तिची तहसीलदार पदी निवड झाली आहे. आदिवासी समाजाच्या महादेव कोळी जमातीतील पूजाचे बी.ई. एमटेकचे शिक्षण पूर्ण झाले आहे. पूजाच्या स्पर्धा परिक्षेच्या अनुभवाचा फायदा इतर आदिवासी विद्यार्थ्यांना देखील व्हावा याकरिता अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, आदिवासी मुलींचे वसतिगृह जुन्नर, राजगुरूनगर, डेहणे, मंचर, घोडेगाव यांच्या गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा व अनुभवी व्यक्तीकडून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळाल्यावर अनेक शंका दूर करता याव्यात आणि आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जावे यासाठी या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हि कार्यशाळा ऑनलाईन, गुगल मिटद्वारे लाईव्ह होणार असून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

—————————–
विषय- स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाचे नियोजन.

मार्गदर्शक:- पूजा भोईर (नवनिर्वाचित तहसीलदार.)

कधी:- मंगळवार, १४ जुलै २०२०.

वेळ:- सायंकाळी ४ ते ५ वाजता.

कुठे:- Google Meet

लिंक:- https://meet.google.com/bmi-xxiy-bpi

CMOMaharashtra , Ministry of Tribal Affairs, Government of India