Img 20220303 Wa0036
ताज्या पनवेल सामाजिक

पोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे

पोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे

पनवेल/ प्रतिनिधी :
 प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे, या कवी संमेलनाचा सुगंध आता दूरवर गेला आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिकस्तरावर ओळख व्हावी असे मत सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेेल तालुक्यातील तामसई (दुंदरे) येथे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या शेततळ्यात पोपटी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या पोपटी कवी संमेलनाचे उद्घाटन करताना कवी अरूण म्हात्रे बोलत होते.
या पोेपटी कवी संमेलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, नाट्य निर्माता विनोद नाखवा, ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, रायगड जिल्हा कोमसापच्या माजी अध्यक्षा सुनिता जोशी, सुप्रसिध्द गझलकार रंजन देव, कोमसाप नवीन पनवेल शाखेचेे अध्यक्ष गणेश कोळी, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, उरण कोमसापचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, पाली कोमसापचे अध्यक्ष धनंजय गद्रे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोपटीचे विधीवत पुजन मान्यवरांच्या हस्ते करून पोपटीला अग्नी देण्यात आला.
यापुढे बोलताना अरूण म्हात्रे यांनी, कवींनी कविता टिकवणे महत्वाचे आहे. कवीता लिहिताना तिचा अभ्यास करावा म्हणजे सुंदर कविता होते. ग्रामीण भागात होणार्‍या या पोपटी कवी संमेलनात वेगवेगळ्या विषयांच्या सादर झालेल्या कवितांमुळे नवोदित कवींना निश्चितच साहित्यिक प्रेरणा मिळेल असेे त्यांनी सांगितले. नाट्य निर्माता विनोद नाखवा यांनी आपल्या भाषणात, अनेक बोलीभाषेतून सादर केलेल्या कविता ह्या त्या-त्या समाजाविषयी आस्था असल्याचे दिसून येते. प्रत्येेकाला आपल्या बोेलीभाषेचा अभिमान आहे. हे अगदी सादर झालेल्या कवितांमधून दिसून येते असे त्यांनी सांगितले.
नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी, कोरोना काळात समाज आणि नाती दूर गेली होती. एकमेकांमध्ये संवाद होत नव्हता त्यात साहित्यिकही होते परंतु या पोपटी कवी संमेलनात मराठी भाषा, कवी आणि काव्य यांचा उत्सवच साजरा झाला. काव्य प्रेमींनी कवितांचा आस्वाद आणि पोपटीची चव चाखत पोपटी कवी संमेलनाचा आनंद घेतल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. कोमसाप नवीन पनवेल शाखेचेे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, गेल्या अनेक वर्षापासून कोमसाप नवीन पनवेल शाखेतर्फे पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रायगडच्या मातीतलं कवी मनाचं ह्या पोपटी कवी संमेलनात अनेक कवी सहभागी होवून काव्याचा उत्सव साजरा केला जातो. नवोदित कवींसाठी हे एक व्यासपीठच आहे. रायगड, नवी मुंबईच्या अनेक भागातून अनेक कवी या पोपटी कवी संमेलनात सहभागी होतात असे त्यांनी सांगितले.यावेळी ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांचे भाषण झाले तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील पाटील यांनी कवींना मार्गदर्शन केले
या कवी संमेलनात जवळ जवळ चाळीस कवींनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या विषयांना कवींनी स्पर्श करून आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये उच्चशिक्षित त्याचप्रमाणेे अधिकारी यांनीही कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.बी.राठोड आणि योगिनी वैदू यांनी केले. या पोपटी कवी संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाने केले.