भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी
उरण/ प्रतिनिधी :
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उरण मतदार संघातून, पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रितम जे. एम. म्हात्रे हे निवडणूक लढवित आहेत. पक्षाच्या बनावट लेटरहेडचा वापर करून, त्यावर “भाजप महायुतीचे उमेदवार महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांना पाठिंबा देणेबाबत ” या विषयांतर्गत मजकूर टंकलिखित करून त्याखाली पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून, सदरचे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित (Viral) करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेचा हा उघड-उघड भंग आहे. तसेच गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबत, सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल तसेच पक्षाची जनसामान्यांमध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले हे कृत्य असून, सदरचे कृत्य हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनी केले असण्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा नोंद करून चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस एडवोकेट राजेंद्र कोरडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे शाखा, निवडणूक निर्णय अधिकारी उरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण, यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.