रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव
पनवेलच्या योगिता पारधी यांना संधी मिळण्याची शक्यता?
कर्जतच्या अनुसया पादीर तर उरणच्या पदीबाई ठाकरे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत
पनवेल/ प्रतिनिधी :
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला याकरीता राखीव झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, पनवेल करांसाठी नामी संधी चालून आली आहे. योगिता जगन पारधी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. दोन्ही पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले. गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. दरम्यान आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, मंगळवारी राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणा करीता सोडत निघाली. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाकरीता अनुसूचित जमाती महिला याकरीता आरक्षण जाहीर झाले.
त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचे अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले. दरम्यान, पनवेल तालुक्यातील वावंजे गटामधील शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या योगिता जगन पारधी यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मोहोदर येथील रहिवासी असलेल्या योगिता या पदवीधर आहेत. त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षाचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. दरम्यान हे पद पनवेलकडे यावे अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. योगिता पारधी यांनी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गटांमध्ये अतिशय चांगले काम केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी लागावी अशी मागणी मंगळवारी दुपारपासून जोर धरू लागले आहे. या आरक्षणामुळे रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाला संधी मिळाली आहे. योगिता यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि सुशिक्षित सदस्याला संधी मिळाली. तर त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास आदिवासी समाजातील विविध संघटना कडून व्यक्त करण्यात आला आहे.
तर कर्जत तालुक्यातील अनुसया पादीर व उरणच्या पदीबाई ठाकरे यांची ही नावे अध्यक्षा पदाकरिता शर्यतीत असल्याचे समजले जाते.