IMG-20210812-WA0029
कळवण ताज्या महाराष्ट्र

रानभाज्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे – आमदार दिलीप बोरसे

रानभाज्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे – आमदार दिलीप बोरसे

कळवण/ सुशिल कुवर :
शहरी भागातील मानवी जीवनाला दैनंदिन आहारात वापरात येतील अश्या आरोग्य वर्धक असलेल्या रानभाज्या शहरी भागातील नागरीकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कृषी विभागाने प्रयत्न करावेत. तसेच आदिवासी शेतकरी बांधवांनी देखील रानभाज्या शहरात आणून त्यांची विक्री केल्यास त्यांना निश्चितच चांगला भाव मिळून आर्थिक प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी येथे बोलताना केले.
बागलाण तालुका कृषी विभागामार्फत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित रानभाज्या महोत्सवाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.


रानभाज्या महोत्सवानिमित्त बागलाण तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल प्रांगणात लावले होते. यावेळी आमदार बोरसे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन प्रत्येक रानभाजीचे माहिती जाणून घेतली व रानभाज्याचे महत्त्व, रान भाजी कशी करावी याबाबत माहिती जाणून घेतली. बागलाणात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल कृषिमंत्री दादा भुसे यांचे आभार मानत आमदार दिलीप बोरसे यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व उपस्थितांना समजावून सांगितले.
डोंगरदर्‍यांमध्ये तसेच रानांमध्ये या भाज्या उपलब्ध होतात. आरोग्यासाठी या भाज्यांचे अनन्य साधारण असे महत्व आहे. त्यामुळे रोजच्या आहारात रानभाज्या खाणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वपुर्ण आहे. शहरात या भाज्या उपलब्ध झाल्यास नागरीक त्या निश्चितच घेतील. त्यामुळे रानभाज्या नागरीकांना दररोज विक्रीसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून तहसील कार्यालयाच्या आवारात स्टॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सुचना आमदार बोरसे यांनी अधिकार्‍यांना यावेळी बोलतांना केली. तसेच आदिवासी शेतकरी बांधवांनी रानभाज्यांची विक्री शहरी भागातील नागरिकांना व्यापारी तत्त्वावर करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी या रानभाज्या महोत्सवास शुभेच्छा दिल्या व शेतकर्‍यांसाठी ई-पीक पाहणी याबाबतची माहिती दिली.
या कार्यक्रमास जि.प. सदस्य गणेश आहिरे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, कृषी विभागाचे मंडळ अधिकारी नाना भोये, अमरचंद आडसूळ आदींसह तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील रानभाज्या उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले व आभार दर्शन खैरनार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 1 =