IMG-20190815-WA0013
ताज्या महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड

शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन

  • शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन.
  • खा.सुनिल तटकरे व आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते परळीत महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन.

सुधागड- पाली/ रमेश पवार :
पत्रकारिता हा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा असा चौथा स्तंभ आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासह सक्षम व आदर्श  समाज  घडविण्यासाठी पत्रकारांचे योगदान व भूमिका मोलाची ठरते. समाजातील अन्याय अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्याबरोबरच आपल्या निर्भिड लेखणीच्या माध्यमातून शासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार करतात. असे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे यांनी केले.
अन्याय अत्याचार  व  पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी शासनदरबारी सातत्याने लढा उभारून आवाज उठवणाऱ्या व पत्रकारांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा निर्माण व्हावा यासाठी कार्यरत असलेल्या महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खा. सुनिल तटकरे व आ. धैर्यशील पाटील यांचे हस्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांच्या उपस्थितीत  दि. (१३) मंगळवार रोजी अत्यंत थाटामाटात व उत्साही वातावरणात करण्यात आले. यावेळी बोलताना खा. सुनिल तटकरे यांनी परिवर्तनाची महान चळवळ छ. शिवाजी महाराजांनी उभी करून रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला व जुलमी राजवटीला उलथवून लावण्याचे काम केले. पुढील काळात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तनाची चळवळ अधिक प्रभावीपणे गतिमान केली. महापरिवर्तनवादी पत्रकार संघ महापुरूषांची वैचारिक, लढाऊ व क्रांतिकारी चळवळीचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे. पत्रकारांनी निःपक्षपाती पणाने व निर्भिडपणे वास्तव मांडण्याची भूमिका यापुढेही कायम ठेवत समाजाला दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन खा. सुनिल तटकरे यांनी केले. यावेळी खा. तटकरे यांनी संपूर्ण रायगड, कोकण व महाराष्ट्र राज्यातील पुरस्तितीचा आढावा घेतला. सर्वत्र महापूराने हाहाकार माजविला असून जनजीवन विस्कळीत केले. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली. पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांचे मोडकळीस आलेले संसार पुन्हा उभे राहावे याकरिता सरकारने पूरग्रस्तांना जलदतेने नुकसानभरपाई द्यावी, तसेच भातशेती कुजून शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे. शेतीच्या उत्पन्नावर निर्भर असलेल्या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत राज्यसरकारने द्यावी अशी मागणी खा. तटकरे यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी व सभासदांना खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी खा. तटकरे यांच्या हस्ते गीता कापड ट्रेडिंग सेंटरचे देखील फित कापून उद्घाटन करण्यात आले. बुद्ध, कबीर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या शौर्य, पराक्रम व इतिहासाचा वारसा व वसा जतन करण्याच्या उदात्त दृष्टिकोनातून महापरिवर्तनवादी पत्रकार संघ अविरतपणे कार्यरत आहे. पत्रकार संघाच्या कार्य कक्षा अधिक विस्तारित व्हाव्यात या उद्देशाने परळी सुधागड याठिकाणी नव्याने निर्माण होत असलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असून भविष्यात पत्रकार संघाचा विस्तार अधिक व्यापक रीत्या राज्य व देशभरात व्हावा अशा शब्दात आ. धैर्यशील पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
पत्रकार संघाच्या उद्घाटन कार्यक्रमास सू. ए.सो.चे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष डॉ.संजय सोनावणे, शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ मोरे, आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दादा लाड, भाजपा जिल्हा सरचिटणीस विष्णूभाई  पाटील, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाशभाऊ देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका उपाध्यक्ष दिलीपभाई टके, जि. प. सदस्य रवींद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते संदीप रामदास पाटील, पेण सुधागड रोहा मतदार संघाच्या रा. काँ.अध्यक्षा गीताताई पालरेचा, सुधागड तालु्का समन्वय समिती अध्यक्ष राजेश मपारा, मराठा सुराज्य संघाचे अध्यक्ष प्रणय सावंत, मनसे जिल्हा सचिव लताताई कळंबे, कोकण नेते व्ही.के.जाधव, रा. काँ.जिल्हा सरचिटणीस प्रदीप वर्तक, संपर्क प्रमुख प्रविणा सावंत, सुधागड तालुका संघर्ष समिती अध्यक्ष प्रमोद मोरे, पत्रकार शामकांत नेरपगार, पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत, पञकार व सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

35 + = 44